वसई : वसई, विरार शहरात काही ठिकाणच्या भागात रिक्षाचालकांकडून अतिरिक्त भाडे आकारले जात आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची लूट होत होती. या लुटीला लगाम घालण्यासाठी परिवहन विभागाकडून भाडे निश्चित करून देण्यात आले आहे. त्या नियमानुसार दरआकारणी करण्याचे आदेश रिक्षाचालकांना देण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोनाकाळात रिक्षाचालकांना दोनच प्रवासी बसवून वाहतूक करण्याची मुभा होती. त्या वेळी रिक्षाचालकांनी भाडेवाढ केली होती.

आता सर्व र्निबध शिथिलता होऊनही भाडेवाढ आहे तीच ठेवली आहे. जवळच्या अंतरासाठीसुद्धा १५ ते २० रुपये इतके भाडेआकारणी केली जात होती. याशिवाय अतिरिक्त प्रवासीसुद्धा बसवूनही भाडे आहे तितकेच आकारणी केले जात होते. यामुळे प्रवासी व रिक्षाचालक यांच्यात खटके उडत होते.

 तसेच ४ ते ५ प्रवासी घेऊनसुद्धा प्रत्येक प्रवासी २० रुपये भाडेआकारणी केली जात आहे. असे प्रकार अनेक ठिकाणी सुरूच आहे. अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या भाडम्ेआकारणीमुळे प्रवाशांची लूट सुरूच होती. याबाबत अनेकदा परिवहन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. ई-मेल मोहीम, प्रहार जनशक्ती पक्षातर्फे स्वाक्षरी मोहीम हाती घेत आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी १५ हजारांहून अधिक प्रवाशांनी यात सहभाग नोंदविला होता. यासह निवेदने परिवहन विभागाला देण्यात आली होती. अखेर वसई उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून रिक्षाभाडय़ाचे दर अंतरानुसार निश्चित करण्यात आले आहे. कोणत्या अंतरासाठी किती दर आहेत याचे फलक ही रिक्षा स्टॅण्डच्या ठिकाणी लावण्यात याव्यात असे आदेश परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

विरार पूर्वेच्या भागात विरार स्थानक पूर्व रेल्वे पुलापासून मनवेलपाडा, कारगिल नगर, फुलपाडा, सहकार नगर, जीवदानी पायथा, नारंगी फाटा या ठिकाणी प्रत्येकी ९ रुपये, विरार स्थानक पूर्व रेल्वेपूल ते साईनाथ नगर १० रुपये, चंदनसार नाका १४ रुपये, कातकरी पाडा १५ रुपये, घाणीचा तलाव १९ रुपये, भाटपाडा २१ रुपये, गडगापाडा २४ रुपये, कुंभारपाडा २९ रुपये, कण्हेर फाटा ३८ रुपये, विरार फाटा ४१ रुपये, शिरसाड फाटा ४५, तसेच विरार स्थानक पूर्व रेल्वे पूल ते शिरगाव व्हाया साईनाथ नगर आणि चंदनसार २१ रुपये असे विरार पूर्वेच्या भागातील दर निश्चित केले आहेत. या दिलेल्या दरानुसारच भाडेआकारणी करण्यात यावी असे आदेश रिक्षाचालकांना देण्यात आले आहेत. जे कोणी दिलेल्या नियमानुसार भाडेआकारणी करणार नाही त्यांच्या विरोधात कारवाई  केली जाईल, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.

प्रवासी व रिक्षाचालक यांचा फायदा व्हावा यासाठी विशिष्ट अंतरानुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. तशा सूचना रिक्षाचालक व त्यांच्या युनियन यांना दिल्या आहेत. जे नियमबाह्य पद्धतीने भाडेआकारणी करतील त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल.  – प्रवीण बागडे, सहायक उपप्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी वसई.

अतिरिक्त प्रवासी भाडेवाढीचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत होता. यासाठी आम्ही स्वाक्षरी मोहीम हाती घेत आंदोलन केले होते. आता आरटीओने दर निश्चित केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.  – हितेश जाधव, जिल्हाध्यक्ष प्रहारजनशक्ती संघटना

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passenger fare for rickshaw fixed in virar by rto department zws