वसई- कॉंग्रेस देश शरिया कायद्याच्या आधारावर चालविण्याच्या प्रयत्न करत आहे. मात्र आम्ही शरिया कायदा देशात चालू देणार नाही, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कॉंग्रेसवर घणाघाती हल्ला केला. पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी शहा यांची सोमवारी दुपारी वसईच्या सनसिटी मैदानात जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘नकली’ संबोधून त्याचाही खरपूस समाचार घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

वसई पश्चिमेच्या सनसिटी येथील मैदानात सोमवारी दुपारी ही सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, उमेदवार हेमंत सावरा आदी उपस्थित होते. आपल्या भाषणात अमित शहा यांनी कॉंग्रेस आणि ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. कॉंग्रेस सत्तेवर आल्यास तिहेरी तलाक पद्धती पुन्हा लागू करेल, कलम ३७० पुन्हा प्रस्थापित करेल असे सांगितले. कॉंग्रेसचा शरिया कायद्यावर देश चालविण्याचा प्रयत्न करत असून आम्ही तो चालू देणार नाही, असे त्यांनी ठणकावले. देशात समान नागरी कायदा लागू करणारच असे त्यांनी ठामपणे सांगितले. नरेंद्र मोदी यांना दुसर्‍यांदा पंतप्रधान केल्यावर त्यांनी राम मंदिर बनवले. हा प्रश्न ७० वर्षे कॉंग्रेसने रखडवून ठेवला होता, असे ते म्हणाले.

हेही वाचा – कोल्हापूर : इचलकरंजीत तरुणाचा खून; ८ जणांवर गुन्हा दाखल

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला कॉंग्रेस नेते गेले नाहीत कारण त्यांना भेंडी बाजाराच्या मतपेढीची चिंता होती, असा आरोप शहा यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था दिली आहे. त्यांना निवडून दिल्यास तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असेही ते म्हणाले. विरोधकांकडे पंतप्रधानांसाठी कुणी चेहरा नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला. यावेळी अमित शहा यांनी मोदी सरकारने केलेली विकास कामे, आदिवासींच्या विविध विकास योजना यांची माहिती दिली. मोदींच्या सार्वजिनक जीवनात त्यांच्यावर चार आण्याच्या भ्रष्टाचाराचा देखील आरोप करू शकले नाही. मात्र कॉंग्रेसने १२ लाख कोंटींचा घोटाळा केला असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे, तुम्ही कुणासोबत बसता?

आपल्या भाषणात अमित शहा यांनी ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. कॉंग्रेस शहिदांचा अपमान करत आहे असे सांगून उद्धव ठाकरे तुम्ही कुणाच्या मांडीला मांडी लावून बसला आहात, असा सवाल केला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असून खरी शिवसेना काय आहे दे दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला बोल

आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी यांनी केलेल्या कामाची माहिती देऊन पुन्हा त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. दहशतवाद्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत आहेत. जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटू द्या असे त्यांना सांगितले. मशालीने काड्या लावायचे उद्योग चालू देऊ नका, मशाल कायमची विझवून टाका असेही ते म्हणाले. आमच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, धनुष्यबाण असल्याने आमची खरी शिवसेना आहे असेही ते म्हणाले. इंडिया आघाडीवर टीका करताना ते भाकरी देशाची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात असे म्हणाले. हेमंत सावरा यांच्या विजयाची गॅरेंटी अमित शहा यांनी घेतली असल्याने त्यांचा विजय पक्का असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या सभेसाठी हजारोंच्या संख्येने लोकं उपस्थित होते. स्थानिक नेत्यांनी बहुजन विकास आघाडीवर जोरदार टीका केली.

हेही वाचा – कोल्हापूर : आवाडे समर्थक सुरज राठी याच्यावर खुनी हल्ला; दोघे अटकेत

खराब हवामानामुळे जाताना रस्त्याने प्रयाण

सोमवारी आलेल्या वादळामुळे खराब हवामान झाले होते. त्याचा फटका अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसला. वातावरण ढगाळ झाल्याने हेलिकॉप्टरऐवजी त्यांना रस्ते मार्गाने मुंबईला जावे लागले.