केशव उपाध्ये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सन २०१४ ते २०१९ च्या सत्ताकाळात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली विकासकामे, परिवर्तन आणि हिंदू अस्मितेची जपणूक यांमुळे २०१९ च्या निवडणुकीत जनतेने पुन्हा दिलेला जनादेश धुडकावून उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लोभापायी महाराष्ट्राची फसवणूक केली. यामुळेच गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेनेत धुमसत असलेल्या असंतोषाचा उद्रेक होऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक बंड झाले. गुरुवारी, ३० जूनला या बंडाचा झेंडा थेट मंत्रालयावर फडकला. भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर माध्यमांसह, सामान्य जनतेच्याही भुवया उंचावल्या, पण या घटनेने राजकारणातील नैतिकतेचे एक उदात्त दर्शन देशाला घडले. जनतेने नाकारलेल्या पक्षांना सत्तेवरून खाली उतरवून हिंदूहित जपणारे आणि विकासाला प्राधान्य देणारे सरकार सत्तेवर असावे या भावनेने नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या त्यागाच्या संस्कृतीची जपणूक केली. सत्तापदासाठी हपापलेल्या राजकारणाच्या गदारोळात फडणवीस यांनी निर्माण केलेला आदर्श राजकारणात नवी संस्कृती रुजविणारा ठरणार असून हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना सोडणाऱ्या आमदारांना साथ देऊन भाजपने आपल्या वैचारिक मूल्यांची निष्ठा सिद्ध केली आहे. हिंदूत्वासाठी मुख्यमंत्री पदाचाही त्याग करण्याची तयारी दाखविणारा भाजप आणि सत्तेसाठी हिंदूत्वास संकटात लोटणारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशी राजकारणाची दोन रूपे या काळात जनतेसमोर आली आहेत.

रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेसची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी निवडणूक आघाडी

मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याकरिता बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये स्थापन केलेल्या शिवसेनेने १९८६ साली हिंदूत्वाच्या विचाराला राजकारणात केंद्रस्थानी आणले. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यातील मंदिरात नमाजाच्या वेळी घंटानाद करून शिवसेनेने खांद्यावर घेतलेला हिंदूत्वाचा झेंडा, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसताच गुंडाळून ठेवला. ‘धर्म आणि राजकारण एकत्र केले ही आमची’ चूक होती अशी जाहीर कबुली विधानसभेतील पहिल्याच भाषणात देऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फसव्या धर्मनिरपेक्षतेच्या विचाराच्या रांगेत नेऊन बसविले, आणि बाळासाहेबांच्या हिंदूत्व-विचाराला आताच्या शिवसेनेच्या राजकारणात स्थान नाही असे स्पष्ट संकेतही देऊन टाकले. केवळ बाळासाहेबांच्या उत्तुंग नेतृत्वाचा करिश्मा आणि कार्यकर्त्यांची बाळासाहेबांवरील अपार श्रद्धा या दोन शक्तींच्या आधारावर जी शिवसेना भाजपचा हात धरून सत्तेपर्यंत पोहोचली, त्याच पक्षाच्या या नव्या नेत्याने, सत्ता मिळताच, बाळासाहेबांच्या हिंदूत्वाचे राजकारण चुकीचे असल्याची कबुली देऊन टाकली. खुद्द बाळासाहेबांच्याच हिंदूत्व-विचारास खुंटीवर बसवून सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्याशी सत्तेची तडजोड करताना ठाकरे यांनी शिवसेनेचा हिंत्वाचा मुद्दाच बासनात गुंडाळला, आणि सत्तेच्या अडीच वर्षांच्या काळात याच मुद्दय़ामुळे त्यांच्यावर वैचारिक कोलांटउडय़ा मारण्याची वेळ आली.

साताऱ्यात शिवसेनेपुढे अस्तित्वाची लढाई

उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात याची असंख्य उदाहरणे दिसतात. हिंदूत्वाचा उच्चार करत हिंदूंवरच अन्याय करणाऱ्या ठाकरे सरकारच्या दुटप्पी भूमिकांमुळेच हिंदूत्वाच्या विचाराने जोडला गेलेला व बाळासाहेबांवर कमालीची श्रद्धा असलेला कडवा शिवसैनिक आपल्यापासून दूर जात आहे, हे त्यांनी लक्षातच घेतले नाही. सत्ता टिकविण्याच्या धडपडीत त्यांनी शिवसैनिकांच्या भावनांपेक्षा सहकारी पक्षांच्या भावना चुचकारणे पसंत केले. काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या नव्या अवतारास खतपाणी घातले आणि ‘हिंदूविरोध हाच सत्तेचा राजमार्ग आहे’, या समजुतीच्या नशेतच अडीच वर्षे वावरताना, बंडाचा सुगावा लागल्यावर पुन्हा हिंदूत्वाची कास धरण्याची त्यांची धडपड सुरू झाली. मग हिंदूत्वाची खिल्ली उडविण्याचे टोमणेबाज प्रकार जन्माला आले, ‘आमचे हिंदूत्व शेंडीजानव्याचे हिंदूत्व नाही, तर गदाधारी हिंदूत्व आहे’ असे सांगताना त्या टोमण्यातील कुत्सित जातीयवादाचे संकेत लपवावे असेही त्यांना वाटले नाही. हिंदूंमधील जातीजातींत भेद निर्माण करून एका विशिष्ट समूहास लक्ष्य करण्याचाच हा प्रयत्न होता. कारण, हिंदूत्वाच्या फसव्या गर्जना करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याच सत्ताकाळात पालघरमधील निरपराध साधूंचे हत्याकांड होऊनही आरोपींना शिक्षा करण्यासाठी कठोर पावले उचलण्याऐवजी त्यांनी तोंडात मिठाची गुळणी धरली. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी सुरू झालेल्या राष्ट्रव्यापी निधी संकलन मोहिमेचीही खिल्ली उडवून, भूमिपूजनाचा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवरच कारवाई करत अनेकांना अटक करविली. एके काळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका इशाऱ्यानिशी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून महाआरतीचा आवाज उमटविणाऱ्या पक्षाच्या या नवपुरोगामी नेत्याच्या उरात, हनुमान चालिसा पठण करण्यासाठी कोणी घरासमोर येणार असे कळताच धडकी भरली, आणि हनुमान चालिसा पठण हा महाराष्ट्रात गुन्हा आहे असा संदेश देण्यासाठी लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करून त्यांना बेजार करून सोडले. त्यांना ‘धडा’ शिकविणारी भाडोत्री फौज रस्त्यावर उतरविली गेली, आणि हिंदूत्वाच्या बढाया मारणाऱ्या या नव्या शिवसेनेचा काँग्रेसी मुखवटा उद्धव ठाकरे यांनी स्वहस्ताने उघड केला. करोनाकाळात प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यामुळे मंदिरांबाहेर लहानमोठे व्यवसाय करणाऱ्या हजारो कुटुंबांवर राज्यभर अक्षरश: उपासमारीची वेळ आली, पण सत्तेतील सहकाऱ्यांच्या हिंदूविरोधाच्या दडपणाखाली कान झाकून घेतलेल्या ठाकरे यांच्या कानावर तो आक्रोश पोहोचलाच नाही. याच काळात त्यांनी दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देऊन हिंदूंच्या भावनांना आपल्या राजकारणात केराच्या टोपलीचे स्थान आहे, हेच दाखवून दिले.

ठाकरे यांच्या या हिंदूविरोधी राजकारणास त्यांच्याच पक्षातील स्वघोषित विश्वप्रवक्त्यांनी भक्कम साथ दिल्याने हा पक्ष बाळासाहेबांच्या हिंदूत्वाच्या भूमिकेपासून दूर गेला हे स्पष्ट झाले होते. १९८८ मध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान, ‘गर्व से कहो हम हिंदू है’, अशी गर्जना करणारे बाळासाहेब, महाआरत्यांसाठी तमाम हिंदूंना रस्त्यावर उतरवून राज्यकर्त्यांना धडकी भरविणारे ‘हिंदूहृदयसम्राट’ बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पुत्राच्या सत्ताकाळात मात्र, ‘जनाब’ बाळासाहेब ठरविले गेले आणि ‘देव मंदिरातून पळाला’, ‘शेंडी-जानव्याचे हिंदूत्व’, ‘धर्म घरात ठेवा’, ‘पंचांगे खुंटावर ठेवा’, ‘सणवार गुंडाळून टाका’ असे विचार त्यांचे सुपुत्र जनतेला देऊ लागले. अजान स्पर्धाचे आयोजन आणि त्रिपुरातील हिंसाचारानंतर रझा अकादमीच्या नेतृत्वाखाली घडविल्या गेलेल्या हिंसक दंगलखोरांवर कारवाई करण्याऐवजी स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर आलेल्या हिंदू कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल केले गेले. बाळासाहेबांच्या हिंदूत्वनिष्ठ भूमिकेला मूठमाती दिल्याचे दाखवून देण्यात ठाकरे यांनी कोणतीच कसर ठेवली नाही.

उद्धव ठाकरे यांनी सत्ताकाळात हिंदूत्वाचा जप करत प्रत्यक्षात मात्र सोडचिठ्ठी दिलीच, पण एकूणच राज्यकारभार करताना विकासाच्या प्रश्नांचीही पार विल्हेवाट लावली. महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या मेट्रो प्रकल्पास खीळ घालणे, शेतकऱ्यांच्या स्वावलंबनास हातभार लावणाऱ्या शेततळय़ांच्या योजनांवर शिंतोडे उडवून त्या बंद पाडणे, अनेक विकासकामांना केवळ आकसापोटी स्थगिती देणे असे विद्वेषाचे राजकारण करताना महाराष्ट्राला विकासापासून वंचित ठेवले. आघाडी सरकारातील मंत्री आणि नेत्यांनी घातलेला धुडगूस महाराष्ट्राच्या जनतेने पाहिला आहे. राज्याला रसातळाला नेणाऱ्या अशा बेबंदशाही कारभाराच्या कचाटय़ातून सोडविणे आणि विकासाचे रोखलेले मार्ग पुन्हा मोकळे करण्यासाठी सत्तांतर घडविणे भाजपला भागच होते. व्यापक जनहित, विकासाचा विचार आणि हिंदूत्वाची विचारधारा ही भाजपची राजनीती असल्यामुळे, सत्तेच्या पदाहूनही त्याची जपणूक करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याकरिता पक्षाने हा निर्णय घेतला. पक्ष आणि देश, राज्याचे हित सर्वोच्च असल्याच्या संस्कारातून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या त्यागामुळे भाजपचीच नव्हे, तर सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा असलेल्या प्रत्येक नागरिकाची मान अभिमानाने उंचावली असेल यात शंका नाही.

लेखक भाजपाचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते आहेत. 

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp spokesperson keshav upadhye article targeting uddhav thackeray over hindutva zws
First published on: 03-07-2022 at 03:30 IST