जीवन में श्रद्धा जरूरी है
पर श्रद्धा अंध हो तो हानी करती है
अंधश्रद्धा नुकसान ज्यादा देती है
अच्छे अच्छों के विश्वास को तोडम् देती है
‘कुकू एफएम’वर प्रसारित होणाऱ्या ‘द बुराडी केस’ या पॉडकास्टमध्ये २०१८ साली दिल्लीत झालेल्या सामूहिक आत्महत्येबद्दलची संपूर्ण कथा सांगितली आहे. या पॉडकास्टमध्ये आर. जे. विरेंद्र मिश्रा याने बुराडी प्रकरणाची सविस्तर घटना श्रोत्यांना ऐकवली आहे. दिल्लीत ११ लोकांनी अंधश्रद्धेला बळी पडून आपल्या वडिलांना पुन्हा भेटता येईल या आशेने आत्महत्या केली. या परिवारातील दुसरा मुलगा मृत वडील आपल्या अंगात येत असल्याचा दावा करतो आणि हळूहळू संपूर्ण परिवाराला तशी खात्री पटवून देतो. त्यानंतर आपल्या वडिलांना परत या जगात घेऊन येण्यासाठी हा परिवार नकळत स्वत:च्या मृत्यूची तयारी करू लागतो आणि प्रत्यक्षातही आणतो. या पॉडकास्टच्या शेवटच्या भागात आर. जे. विरेंद्र मिश्रा याने ‘जीवन में श्रद्धा जरूरी है पर श्रद्धा अंध हो तो हानी करती है, अंधश्रद्धा नुकसान ज्यादा देती है अच्छे अच्छों के विश्वास को तोडम् देती है’ या अर्थपूर्ण काव्यपंक्ती ऐकवल्या आहेत.
दिल्लीतील या बहुचर्चित बुराडी आत्महत्या प्रकरणावर आधारित दोन वेब मालिका आणि काही व्हिडीओ पाहिल्यानंतर याविषयी अधिक महिती गोळा करण्याची उत्सुकता माझ्या मनात होती. तेव्हापासून मी हा पॉडकास्ट ऐकायला सुरुवात केली. लोक अंधश्रद्धेच्या किती वाईट प्रकारे आहारी जाऊ शकतात हे या प्रकरणामुळे जाणून घेता येते. आपल्याला लहानपणापासून हे सांगितलं जातं की, एकदा मृत पावलेली व्यक्ती परत येऊ शकत नाही आणि तरीही हे वास्तव विसरून एखादा परिवार अंधश्रद्धेपोटी एवढं मोठं धाडस कसं करू शकतो? असा प्रश्न सतत मनात येतो. मला गुन्हेगारी विश्वाची माहिती घ्यायला नेहमी आवडते म्हणून हा पॉडकास्ट मी दोन वेळा ऐकला आहे. -चेतन भोसले (विद्यार्थी)
शब्दांकन: श्रुती कदम