पेट्रोलऐवजी बॅटरीवर चालणारी एक अर्धस्वयंचलित खरीखुरी ‘मोटार’सायकल अंबरनाथ येथील सेवानिवृत्त विज्ञानप्रेमी प्रभाकर गोखले यांनी तयार केली आहे. पर्यावरण, पैसा आणि आरोग्य रक्षण अशा तिन्ही दृष्टीने सध्या काळाची नितांत गरज असूनही कालबाह्य़ ठरू लागलेली सायकल या नव्या सुविधेमुळे पुन्हा लोकप्रिय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
स्टेट बँकेतून उपव्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले प्रभाकर गोखले गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ कल्याण येथील ‘आकाश मित्र मंडळ’ या खगोल अभ्यासकांच्या संस्थेचे क्रियाशील सभासद आहेत. एका विज्ञान प्रदर्शनात त्यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेली बॅटरीवर चालणारी सायकल पाहिली. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना आलेला खर्च अफाट होता. तेव्हापासून कमी खर्चात प्रवास सुलभ होणाऱ्या अर्धस्वयंचलित सायकलची निर्मिती करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. बऱ्याच खटपटीनंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यांनी साध्या सायकलला प्रत्येकी १२ व्ॉटच्या दोन बॅटऱ्यांच्या सहाय्याने अर्धस्वयंचलित केले आहे. या दोन बॅटऱ्यांमुळे त्यांना अध्र्या तासात नऊ किलोमीटर अंतर कापता आले. विशेष म्हणजे आवश्यक तेव्हाच बॅटरी वापरण्याची सोय या सायकलमध्ये आहे. केवळ चढ चढून जाण्यासाठी बॅटरीचा वापर केल्यास ती १८ ते २० किलोमीटर अंतर सहज कापू शकते. अर्थात अधिक व्ॉटची बॅटरी असेल तर सायकल अधिक अंतर कापू शकेल.
शहरांतर्गत प्रवासासाठी ही सायकल अतिशय उपयुक्त आहे. सध्या सायकल सर्वसाधारणपणे चार हजार रुपयांना सायकल मिळते. तिला अशा पद्धतीने अर्धस्वयंचलित करण्यास आठ हजार रुपये खर्च येतो. तरीही स्वयंचलित दुचाकीच्या तुलनेत ती कितीतरी स्वस्त आहे.
पेट्रोल दिवसेंदिवस महाग होत असल्याने पुन्हा एकदा सायकलचे महत्त्व नागरिकांना पटू लागले आहे. परंपरागत सायकल अशा रितीने बॅटरीने चालविणे शक्य असल्याने पेट्रोलचे पैसे वाचतीलच; शिवाय प्रदूषणही होणार नाही. ७१ वर्षीय प्रभाकर गोखले अंबरनाथमध्ये ही सायकल चालवितात. मात्र तेवढय़ावरच ते समाधानी नाहीत. त्यांना ही सायकल सौरऊर्जेवर चालवायची आहे. विशिष्ट पॅनल लावले तर ही सायकल सौरऊर्जेवरही चालेल, असा त्यांचा विश्वास आहे. खगोल हा त्यांचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. त्यांनी निरनिराळ्या खगोलीय अवस्थांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा विषय समजून घेणे सोपे जाते. याशिवाय दोन्ही हाताच्या बोटांच्या सहाय्याने छायाप्रकाशाच्या माध्यमातून निरनिराळ्या आकृत्या दाखवून ते मुलांचे मनोरंजन करतात. अर्धस्वयंचलित सायकल बनविण्याची आपली कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी गोविंदराज, मनोज बिनानी आणि राजन जोशी यांची खूप मदत झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Nov 2013 रोजी प्रकाशित
सायकलला बॅटरीचे पॅडल..
पेट्रोलऐवजी बॅटरीवर चालणारी एक अर्धस्वयंचलित खरीखुरी ‘मोटार’सायकल अंबरनाथ येथील सेवानिवृत्त विज्ञानप्रेमी प्रभाकर गोखले यांनी तयार केली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 07-11-2013 at 07:18 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Battery pandal for cycle