अल्पसंख्याक फेडरेशनचा आरोप
शासनाने अल्पसंख्याकांसाठी सुरू केलेले मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळ कागदोपत्रीच असल्याचा आरोप अल्पसंख्याक फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेत माहिती देताना अल्पसंख्याक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष तय्यबअली सय्यद म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्य़ात मुस्लिम समाज व अल्पसंख्याकांची संख्या मोठी असून त्यांच्या समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यांच्या सर्वागीण विकासासाठी शासनाने मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. मात्र, हे महामंडळ जिल्ह्य़ात केवळ कागदावरच आपले अस्तित्व राखून आहे. २००८ पासून या महामंडळाद्वारे एकही प्रकरण पूर्ण करण्यात आलेले नाही. पूर्वी जिल्हा उद्योग केंद्रात या महामंडळाचा एक अधिकारी बसायचा. हा अधिकारीही आता दिसत नाही. त्यामुळे अल्पसंख्याक समाज शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित आहे. शासनाने हे आर्थिक विकास महामंडळ सक्षम करून येथे महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
शासकीय कार्यक्रम व मेळाव्यामध्ये ज्याप्रमाणे समाजकल्याण विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल्स लावतात तसे स्टॉल्स अल्पसंख्याक विभागानेही लावायला हवे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देताना गुणांची, वार्षिक उत्पन्नाची अट ठेवू नये, गडचिरोली आणि वडसा नगर परिषद क्षेत्रातील गरजू, आर्थिकदृष्टय़ा मागास, बेघर असलेल्या अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा, चामोर्शी पोलीस ठाण्यात कामावर असताना मृत्यू झालेले गृहरक्षक खालीद शेख यांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी, गडचिरोली येथील इंदिरा नगर, रामनगर व लांझेडा येथे अल्पसंख्याक समाजाकरिता स्मशानभूमीची जागा द्यावी, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या फेडरेशनचे अध्यक्ष तय्यबअली सय्यद यांनी पत्रकार परिषदेत केल्या. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला अल्पसंख्याक फेडरेशनचे जिल्हा महासचिव मुश्ताक शेख, अमित शेख, अकील शेख, बशीर शेख, जमील शेख, अन्वरखाँ पठाण, शाहरुख शेख, शोहेब कुरेशी, आयशा खाँ पठाण, अनवरी शेख आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 22nd May 2013 रोजी प्रकाशित
अल्पसंख्याकांचे आर्थिक विकास महामंडळ कागदोपत्रीच
अल्पसंख्याक फेडरेशनचा आरोप शासनाने अल्पसंख्याकांसाठी सुरू केलेले मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळ कागदोपत्रीच असल्याचा आरोप अल्पसंख्याक फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-05-2013 at 09:36 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Economic development corporation of minority it only on papers