नाशिकरोड येथील ऋतुरंग परिवारातर्फे गुढीपाडव्यानिमित्त शनिवारी पहाटे ५.३० वाजता ऋतुरंग भवन येथे किराणा-आग्रा गायकी घराण्याच्या प्रख्यात गायिका शैला दातार यांच्या गायनाने ‘पाडवा पहाट’ सजणार आहे.
देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांच्या नातसून असलेल्या शैला दातार यांचा त्यांच्या गायकीचा व ठुमरी, ख्याल नाटय़संगीत या गानविष्काराचा दांडगा अभ्यास आहे. लहानपणापासून त्यांना पंडित डॉ. वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, राम मराठे, स्वरराज छोटा गंधर्व आदींचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले आहेत. भास्करबुवा बखले ट्रस्टच्या विश्वस्त व पुणेस्थित भारत गायन समाजाच्या अध्यक्षा या नात्याने त्या आजही अनेक तरुण गायकांना मार्गदर्शन करत असतात. याशिवाय त्यांनी पं. छोटा गंधर्व, पं. जितेंद्र अभिषेकी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या साथीने अनेक संगीत मैफली गाजविल्या आहेत. अशा गानतपस्वीच्या स्वरांनी नववर्षांची सुरुवात होण्याचा योग ऋतुरंग परिवाराने जुळवून आणला आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक नाशिकरोड येथील गोविंद दंडे हे असून संगीतप्रेमींनी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ऋतुरंग परिवारातर्फे करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudhipadwa celebration in nashik