केडगावमधील ८ जागांसह अन्य ८, १६, १७ व २८ या ४ प्रभागांमधील जागा वाटप अद्याप प्रलंबित असल्याचा दावा करीत राष्ट्रवादीने काँग्रेसला शेवटच्या क्षणी कोंडीत पकडले आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी आघाडीमध्ये उद्या, रविवारी चर्चा होणार आहे. वादातील जागांबाबत समाधानकारक तोडगा निघाला नाहीतर सर्व ६८ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी असल्याचा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप व माजी आमदार दादा कळमकर यांनी हा इशारा देत काँग्रेसबरोबरच्या आघाडीच्या चर्चेत केडगावमधील ८ जागांबाबत चर्चाच झाली नसल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पक्षाच्या वरिष्ठांनी आमच्याकडे सर्व ६८ जागांचे ‘एबी’ फॉर्म दिले असल्याकडे माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले यांनी लक्ष वेधले. माजी महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप यावेळी उपस्थित होते.
केडगाव उपनगरातील चार प्रभागातील सर्व म्हणजे आठही जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी काँग्रेसमधील कोतकर गट आग्रही आहे. त्यासाठी माजी महापौर संदीप कोतकर यांनी महानगर विकास आघाडी स्थापन करुन तसेच अप्रत्यक्षरीत्या पक्ष सोडण्याचा इशारा दिला. कालपर्यंत काँग्रेसच्या वरिष्ठ गोटातून, राष्ट्रवादी बरोबर चर्चा करताना केडगावमधील जागांबाबत सात काँग्रेसला तर एक राष्ट्रवादीला देण्याबाबत तडजोड झाल्याची माहिती दिली गेली होती. परंतु काँग्रेसचा हा दावा आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फेटाळला. राष्ट्रवादीने काँग्रेसकडे केडगावमधील निम्म्या जागा मागितल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
आघाडीत जागा वाटप करताना काँग्रेसचा निम्म्या जागांवरचा दावाही आम्हाला नामंजूर असल्याचे जगताप व कळमकर यांनी सांगितले. केडगाव व ८, १७, १८ व २८ या जागा वगळता इतर सर्व जागांवर निर्णय झाला असल्याचे, ज्यांच्याकडे निवडून येणारे उमेदवार आहेत, त्या जागा त्यांना देण्याचे धोरण आघाडीची चर्चा करताना स्वीकारले होते, परंतु नंतर या धोरणापासून काँग्रेस घसरली असा आरोप दोघांनी केला. आघाडी करुन खरेतर आमचे नुकसानच होत आहे, कारण अनेक जागांवर आमच्याकडे शंभर टक्के निवडून येणारे उमेदवार आहेत, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrawadi warns congress about kedgaon wards