नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील टीकेवर आक्षेप घेत सभापती जगदीप धनखड यांनी सोमवारी संघाची अप्रत्यक्ष तरफदारी केली आणि खरगेंची टिप्पणी कामकाजातून काढून टाकली.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान खरगेंनी शिक्षण धोरणामध्ये संघाच्या विचारांचा प्रभाव असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर संघ ही देशासाठी कार्यरत असणारी संघटना आहे. या संघटनेचा सदस्य असणे गुन्हा ठरतो का, असा सवाल धनखड यांनी खरगेंना केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संघामध्ये अनेक बुद्धिवादी लोक आहेत. अविश्रांत काम करणाऱ्या संघटनेला तुम्ही धोपटून काढत आहात, असे धनखड म्हणाले. संघावर टिप्पणी करणे योग्य नसल्याचे सांगत खरगेंचे संघावरील मुद्दे कामकाजातून काढून टाकण्याच्या सूचना धनखड यांनी केल्या. राज्यसभेचे सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी संघाच्या उल्लेखावर आक्षेप नोंदवला. लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही सोमवारी विरोधकांनी सरकार आणि भाजपला लक्ष्य केले.

हेही वाचा >>>“राहुल गांधींचे भाषण म्हणजे स्टँडअप कॉमेडी…”, खासदार कंगना रणौत, रवि किशन यांची टीका

खरगेंनीही अग्निवीर, पेपरफुटी, मणिपूरमधील हिंसाचारावरून पंतप्रधानांना जाब विचारला. खरगेंनी मणिपूरचाही उल्लेख करत सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारला दिलेल्या सल्ल्यावरही टिप्पणी केली.

‘पंतप्रधानांची भाषणे समाजात फूट पाडणारी’

२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकवेळा मुस्लिम, पाकिस्तानचा उल्लेख करून ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला.

समाजात फूट पाडणारी भाषणे यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी केली नव्हती, असा आरोप खरगे यांनी केला. त्यावर यासंदर्भातील पुरावे सभागृहात सादर करण्याचे निर्देश धनखड यांनी खरगेंना दिले.

वृत्तपत्रातील कात्रणांशिवाय दुसरे कोणते पुरावे विरोधक देऊ शकतील, असा युक्तिवाद माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केला. मात्र धनखड यांनी हा युक्तिवाद फेटाळत खरगेंच्या केंद्र सरकार व मोदींविरोधातील टिप्पणी कामकाजातून काढून टाकल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion over criticism of kharge team remarks by rajya sabha speaker dismissed from proceedings amy