करोना काळात सर्वाधिक मुलं अनाथ झालेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा समावेश; देशात १ लाख ४७ हजार मुलांचं छत्र हरपलं

अनाथ झालेल्यांपैकी ५९ हजार १० मुलं अशी आहेत ज्यांचं वय ८ ते १३ वर्षांदरम्यान आहे.

Covid Orphans in India NCPCR Data
सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलं प्रतिज्ञापत्र (प्रातनिधिक फोटो)

करोना कालावधीमध्ये जवळजवळ १ लाख ५० हजार मुलांच्या डोक्यावरील आई-वडीलांचं छत्र हरपलं आहे. या मुलांच्या आई किंवा वडिलांचं किंवा दोघांचंही निधन झाल्याने ती अनाथ झाल्याची माहिती राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलं आहे. १ एप्रिल २०२० पासून ११ जानेवारी २०२२ पर्यंत देशातील १ लाख ४७ हजार मुलांनी करोना किंवा अन्य कारणामुळे आपल्या आई-वडिलांना किंवा दोघांपैकी एकाला गमावलं आहे, असं आयोगाने म्हटलंय.

एनसीपीसीआरने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये करोना कालावधीमध्ये ११ जानेवारीपर्यंत १० हजार ९४ मुलं पूर्णपणे अनाथ झाल्याचं म्हटलंय. तर १ लाख ३६ हजार ९१० अशी मुलं आहेत ज्यांच्या आईचं किंवा वडीलांचं या कालावधीमध्ये निधन झालंय. तसेच ४८८ मुलं पालकांनी सोडून दिलेली आढळून आल्याचंही एनसीपीसीआरने म्हटलंय.

माहिती कुठून आली?
आयोगाच्या आकडेवारीनुसार १ लाख ४७ हजार मुलांपैकी ७६ हजार ५०८ मुलं असून ७० हजार ९८० मुलींचा अनाथ झालेल्यांमध्ये समावेश आहे. चार मुलं ही ट्रान्सजेंडर आहेत. ही माहिती आयोगाला राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडून ‘बाल स्वराज पोर्टल कोव्हिड केअर’च्या माध्यमातून मिळालीय.

८ ते १३ वर्षांमधील ५९ हजार मुलं
एनसीपीसीआरच्या प्रतिज्ञापत्रानुसार अनाथ झालेल्यांपैकी ५९ हजार १० मुलं अशी आहेत ज्यांचं वय ८ ते १३ वर्षांदरम्यान आहे. २६ हजार ८९ मुलं अशी आहेत जी वयाच्या चार ते सात वर्षांदरम्यान अनाथ झालीय. तर १४ ते १५ वर्ष वयोगटामधील २२ हजार ७६३ मुलांनी आपल्या पालकांपैकी एकाला गमावलंय. आयोगाच्या आकडेवारीनुसार १ लाख २५ हजार २०५ मुलं आपल्या पालकांपैकी एका पालकासोबतच सध्या राहत आहे. ११ हजार २७२ मुलं पालकांपैकी एक जण वारल्यानंतर आपल्या कुटुंबियांसोबत राहत आहेत. तर १ हजार ५२९ मुलं बालसुधारणा गृहांमध्ये राहत आहेत.

सर्वाधिक अनाथ मुलं कोणत्या राज्यात?
करोना साथीच्या कालावधीमध्ये अनाथ झालेल्या मुलांची सर्वाधिक संख्या ओडिशा राज्यातील आहे. या राज्यातील २४ हजार ५०५ मुलांचा यामध्ये समावेश आहे. त्या खालोखाल महाराष्ट्रामधील १९ हजार ६२३ मुलांवरील पालकांचं छत्र हरवलं आहे. गुजरातमधील १४ हजार ७७०, तामिळनाडूमधील ११ हजार १४, उत्तर प्रदेशमधील ९ हजार २४७ आणि आंध्र प्रदेशमधील ८ हजार ७६० मुलं अनाथ झालीय. मध्य प्रदेशमधील ७ हजार ३४०, पश्चिम बंगालमधील ६ हजार ८३५, दिल्लीतील ६ हजार ६२९ आणि राजस्थानमधील ६ हजार ८२७ मुलं अनाथ झाली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Covid orphans in india ncpcr data given to supreme court scsg

Next Story
Coronavirus : प्रौढ करोनाबाधित रूग्णांच्या उपचारांसाठी केंद्राने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केली सुधारणा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी