भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा आपल्यासाठी अत्यंत भावूक क्षण असल्याचं म्हटलं आहे. लालकृष्ण आडवाणी यांना त्यांच्या राजकीय आयुष्यातील योगदानाबद्दल या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. लालकृष्ण आडवाणी यांनी अयोध्येत राम मंदिर बांधलं जावं यासाठी रथयात्रा काढली होती. या यात्रेमुळे भाजपाला देशस्तरावर एक वेगळी ओळख प्राप्त झाली. लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले आहेत की आडवाणी यांनीच २००२ मध्ये मोदींची खुर्ची वाचवली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले आहेत जयराम रमेश?

“तत्कालीन दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००२ मध्ये गोध्रा दंगलीनंतर नरेंद्र मोदी यांना राजधर्माची आठवण करुन दिली होती. वाजपेयी नरेंद्र मोदींना २००२ मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरुन हटवू इच्छित होते. मात्र त्यावेळी फक्त एक व्यक्ती असे होते ज्यांनी मोदींची खुर्ची वाचवली. लालकृष्ण आडवाणी यांनी भाजपाच्या गोव्याच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर कायम ठेवलं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यांनी नरेंद्र मोदींची बाजू घेतली होती. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांची खुर्ची वाचली.” असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वीच कर्पूरी ठाकूर यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर आता लालकृष्ण आडवाणी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात नानाजी देशमुख, भुपेन हजारिका, प्रणव मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी , मदन मोहन मालवीय या सगळ्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले. या यादीत आता लालकृष्ण आडवाणींचं नावही जोडलं गेलं आहे.

हे पण वाचा- अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची पहिली भेट कुठे झाली होती? वाचा रंजक किस्सा

लालकृष्ण आडवाणी म्हणाले होते मोदी उत्तम इव्हेंट मॅनेजर

जयराम रमेश यांना जेव्हा पत्रकारांनी लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला त्याविषयी विचारलं त्यावेळी त्यांनी गुजरातचा प्रसंगत तर सांगितलाच. शिवाय पुढे ते म्हणाले, “लालकृष्ण आडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांचं वर्णन उत्तम इव्हेंट मॅनेजर असं केलं होतं. २०१४ मध्ये जेव्हा भाजपाने लोकसभा निवडणूक जिंकली तेव्हा लालकृष्ण आवडाणी म्हणाले होते, नरेंद्र मोदी माझे शिष्यच नाही तर उत्तम इव्हेंट मॅनेजर आहेत. लालकृष्ण आडवाणी हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनीच हे शब्द मोदींसाठी वापरले होते. ” असं रमेश यांनी म्हटलं आहे. मी मोदी आणि आडवाणी यांना जेव्हा पाहतो तेव्हा मला या दोन गोष्टी आवर्जून आठवतात असं जयराम रमेश म्हणाले आहेत.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतरत्न देण्यासाठी लालकृष्ण आडवाणी यांची आठवण फारच उशिरा आली. अशा विविध प्रतिक्रिया या निर्णयावर उमटत आहेत. अशात जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदींची खुर्ची कशी आडवाणींनी वाचवली ते सांगत टोला लगावला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lk advani saved narendra modi as gujarat chief minister in 2002 said jairam ramesh scj