राष्ट्रीय पात्रता-प्रवेश परिक्षेमध्ये देशभरात जो गोंधळ पाहायला मिळाला, त्यावरून आता NEET परिक्षा देणारे विद्यार्थी देशभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या विषयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पेपरफुटी प्रकरणामुळे देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतात. पण काही कारणांमुळे ते भारतातील पेपरफुटी थांबवू शकत नाहीत.

राहुल गांधी पुढे म्हणाले, भाजपाकडून शैक्षणिक क्षेत्र ताब्यात घेतल्यामुळेच पेपरफुटी प्रकरणे घडत आहेत. आतापर्यंत पेपरफुटीची प्रकरणे थांबण्याऐवजी ती वाढतच आहेत. भाजपाने शैक्षणि संस्थांवर आपल्या विचारांचे लोक नियुक्त केले आहेत. पेपरफुटीवर या लोकांकडून कार्यवाही होण्याची गरज होती, मात्र त्यांनी काहीच केले नाही. सुमार लोक शैक्षणिक संस्थांवर नेमल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.

“जर ०.००१ टक्केही निष्काळजीपणा झाला असेल तरी…”, सर्वोच्च न्यायालयाचे NEET वरून केंद्र सरकारला खडेबोल

“या प्रकरणी आता चौकशी सुरू आहे. एक परीक्षा रद्द झाली आहे. पुढची परीक्षा होणार की नाही? याची कल्पना नाही. या पेपरफुटीसाठी जे जे लोक जबाबदार आहेत, त्यांना अटक करून कारवाई केली गेली पाहीजे”, असेही राहुल गांधी म्हणाले.

नरेंद्र मोदी नावाची संकल्पना आता कालबाह्य

नरेंद्र मोदी नावाच्या संकल्पनेची गुजरात मॉडेलपासून सुरूवात झाली. हजारो कोटी रुपये खर्च करून मार्केटिंग करणे आणि सरकारी यंत्रणेचा वापर करून भीती निर्माण करणे, अशी ही संकल्पना होती. पण आता देशात कुणी मोदींना घाबरत नाही. जी ५६ इंचाची छाती होती, ती आता ३०-३२ वर आली आहे. याचा मानसिक परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदीवर होणार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

UGC NET Exam 2024 : यूजीसी नेट परीक्षा रद्द; पेपर फुटल्याचा संशय, शिक्षण मंत्रालयाने दिली माहिती

म्हणून मोदींवर चप्पल फेकली गेली

“मोदींची भीती नष्ट झाल्यामुळेच वाराणसीमध्ये त्यांच्या ताफ्यावर कुणीतरी चप्पल फेकली. याचा अर्थ मोदींची आता भीती राहिली नाही. देशातील विरोधकांनी मोदींच्या प्रतिमेला तडा दिला. त्यामुळे मोदींची भीती राहिली नाही. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा स्वभाव सर्वांना आवडणारा होता. अशा कठीण प्रसंगातून त्यांनी नक्कीच वाट काढली असती. पण नरेंद्र मोदींची शैली अशी आहे की, ते कुणाचे ऐकून घेत नाही. माझा मार्ग हाच सर्वोत्तम महामार्ग अशी त्यांची हेकेखोर वृत्ती असते. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत त्यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत”, असे सुतोवाच राहुल गांधी यांनी केले.