गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. मद्यधुंद अवस्थेतील एक तरुण हातात सिगरेट घेऊन एका व्यक्तीवर लघुशंका करत असल्याचा हा व्हिडीओ होता. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील ही घटना आहे. या प्रकरणी राज्य सरकार आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रवीण शुक्ला या आरोपीला अटकही केली. यावरून तेथे राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले आहे. मात्र, सर्व प्रकरानंतरही या प्रकरणातील पीडित असलेल्या दशमत रावत यांनी राज्य सरकारकडे वेगळीच मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणातील आरोपी प्रवीण शुक्ला याला माफ करा, त्याला सोडून द्या, अशी मागणी आदिवासी समाजातील दशमत रावत यांनी राज्य सरकारकडे केली आहे. प्रवीण शुक्ला याला त्याची चूक कळली आहे, त्यामुळे त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी विनंती दशमत रावत यांनी केली आहे.

“सरकारला माझी विनंती आहे की प्रवीण शुक्लाकडून चूक झाली असून आता त्याची आता सुटका करावी. जे काही घडलं, त्याला त्याची चूक लक्षात आली आहे”, अशी प्रतिक्रिया दशमत रावत यांनी प्रसिद्धी माध्यमांना शुक्रवारी दिली. दरम्यान, तुम्ही सरकारकडे अजून काय मागणी करणार आहात असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, “गावात रस्ता बांधून देण्याची मी विनंती करेन”, असं ते म्हणाले.

काय आहे प्रकरण?

प्रवीण शुक्ला नावाच्या इसमाने आदिवासी समाजातील दशमत रावत या व्यक्तीवर लघुशंका केली. हा प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांपर्यंत ही खबर पोहोचली. परंतु, हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे स्पष्ट होत नव्हते. अखेर हा व्हिडीओ मध्य प्रदशातील सिधी जिल्ह्यातील असल्याचं स्पष्ट होताच तेथील पोलीस सक्रिय झाले. त्यांनी प्रवीण शुक्लाला तत्काळ अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तो सध्या आता तुरुंगात आहे.

हे प्रकरण उजेडात येताच मध्य प्रदेशात राजकीय वातावरणही तापलं आहे. तिथे येत्या डिसेंबरपर्यंत निवडणुका होण्याची शक्यता असल्याने विरोधकांनी सरकावर हल्लाबोल केला. दरम्यान, प्रवीण शुक्ला हा भाजपाचा कार्यकर्ता असल्याचाही दावा विरोधकांकडून करण्यात आला. तर, दुसरीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दशमत रावत यांचे पाय धुतले. या प्रकरणाला विरोधकांनी मुख्यमंत्र्यांचे ढोंग संबोधले आहे. दरम्यान, प्रवीण शुक्लाच्या घरावरही बुलडोझर फिरवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Release man who urinated on me he has realised mistake mp govt urged sgk