मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील देहात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवरान गावात एका दलित कुटुंबातील तिघांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात दलित कुटुंबातील अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच देहात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत सर्व आरोपी फरार झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना मंगळवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली आहे. देवरान गावातील जगदीश पटेल यांचं कुटुंब आणि घमंडी अहिरवार यांच्या कुटुंबात किरकोळ कारणातून वाद झाला होता. एका महिलेवरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हा वाद वाढत गेल्यानंतर जगदीश पटेल यांच्या कुटुंबातील सहा जणांनी दलित कुटुंबावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- डोंबिवली : ऐन दिवाळीच्या दिवशी मामाकडून भाच्याचा खून; कुटुंबादेखत चाकुने केले वार

मनक अहिरवार (वय-३०), वडील घमंडी अहिरवार (वय-६०) आई राजप्यारी अहिरवार (वय-५८) असं मृत पावलेल्या दलित कुटुंबातील सदस्यांची नावं आहेत. याप्रकरणी पोलिसांनी जगदीश पटेल यांच्या कुटुंबातील सहाजणांविरोधात अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three members of dalit family killed in gun firing 2 injured crime in madhya pradesh rmm