शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांनाच भाजपची मदत ; महाराष्ट्रात भाजपची १६ लोकसभा मतदारसंघांत बांधणी फडणवीस यांची ग्वाही

शिंदे गटाशी युती केली असल्याने त्यांच्या उमेदवारांना निवडून आणू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.

शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांनाच भाजपची मदत ; महाराष्ट्रात भाजपची १६ लोकसभा मतदारसंघांत बांधणी फडणवीस यांची ग्वाही
देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : भाजपने राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रीय केले असून या मतदारसंघांमध्ये पुढील दोन वर्षांच्या काळात भाजपची पक्षीय संघटना मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, शिंदे गटाशी युती केली असल्याने त्यांच्या उमेदवारांना निवडून आणू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.

आत्तापर्यंत भाजपने न जिंकलेले वा कमी मताधिक्याने पराभव पत्करावा लागलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये पक्ष मजबूत करण्याचे धोरण भाजपने आखलेले आहे. त्यामध्ये राज्यात बारामती, कल्याण आदी १६ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे निवडून आलेले आहेत. शिंदे गटाशी भाजपने युती केली नव्हती, तेव्हा कल्याण मतदारसंघ शिवसेनेकडून काबीज करण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले होते. पण, आता राज्यात शिंदे-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले असून आगामी लोकसभा निवडणूकही एकत्रितपणे लढवली जाणार आहे. ‘’१६ लोकसभा मतदारसंघात भाजप मजबूत झाला तरी, या मतदारसंघात विद्यमान खासदार शिंदे गटाचा असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी भाजप पक्षीय संघटनेची ताकद वापरेल’’, असे फडणवीस यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे लक्ष्य असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांचाही समावेश भाजपने केला आहे. पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ‘’बारामती मतदारसंघात गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला अपेक्षित मते मिळाली आहेत.  १६ लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे देण्यात आलेली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आली आहे. सीतारामन सप्टेंबर महिन्यामध्ये बारामतीचा दौरा करतील’’, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. 

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच!

शिंदे गट-भाजप युतीचे सरकार स्थापन होऊन ३७ दिवसानंतरही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राज्याचा गाडा चालवत असले तरी, ‘’आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल’’, असे फडणवीस म्हणाले. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून यावरील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. या निकालावर मंत्रिमंडळाचा विस्तार अवलंबून असल्याचे मानले जात असले तरी, ‘’न्यायालयातील सुनावणी व मंत्रिमंडळ यांचा एकमेकांशी संबंध नाही’’, असे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार व रविवार दोन दिवस दिल्लीत होते. संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपासंदर्भात भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा झाली असल्याचे समजते. फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी दिली जाण्याची तसेच, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते, असे मानले जात आहे. महिन्याहून अधिक काळ रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आठवडाभरात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे मंत्रीमंडळ विस्ताराला उशीर होतोय का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…
फोटो गॅलरी