अभय नरहर जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील मार-ए-लागो निवासस्थानी ‘एफबीआय’ या अमेरिकेच्या तपास यंत्रणेने नुकताच छापा टाकला. ‘व्हाईट हाऊस’मधील काही गोपनीय कागदपत्रे तेथे सापडल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी ‘एफबीआय’च्या तपासाचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यानिमित्त ट्रम्प यांच्याविरुद्ध चौकशी-तपास आणि खटल्यांचा घेतलेला आढावा…

मार-ए-लागो निवासस्थानी काय सापडले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले, की ‘एफबीआय’च्या पथकाने फ्लोरिडाच्या पाम बीच येथील त्यांच्या मार-ए-लागो येथील निवासस्थानी छापा टाकला. या पथकातील अधिकार्‍यांनी ट्रम्पच्या आरोपांवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. या छाप्यातील तपासाची दिशा अद्याप स्पष्ट व्हायची आहे. अमेरिकेच्या अभिलेखागाराने (यूएस नॅशनल अर्काइव्हज अँड रेकॉर्ड्स) फेब्रुवारीत काँग्रेससमोर स्पष्ट केले होते, की ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील घरातून ‘व्हाईट हाऊस’च्या कागदपत्रांच्या सुमारे १५ पेट्या जप्त करण्यात आल्या आहेत, त्यात काही गोपनीय दस्तावेज आहेत. ‘यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज ओव्हरसाइट कमिटी’ने या प्रकरणी तपासाची व्याप्ती वाढवत असल्याचे स्पष्ट केले होते. यासंदर्भात अभिलेखागारास अधिक माहिती गोळा करण्यास सांगितले गेले होते. ट्रम्प यांनी काही दस्तावेज परत करण्यास सहमती दर्शवली होती.

हेदेखील वाचा –

विश्लेषण: आपल्या रोजच्या जेवणात वापरलं जाणारं मीठ कुठून येतं? मिठावर नेमकं नियंत्रण कोणाचं आहे?
विश्लेषण : IMEI क्रमांक काय असतो? कोणत्याही तपासात पोलिसांना या क्रमांकाचा कसा उपयोग होतो?

‘यूएस कॅपिटल’ हल्लाप्रकरणी आरोप कोणते?

अमेरिकन काँग्रेसचे प्रतिनिधी सभागृह व सेनेट सभागृह असलेली वास्तू ‘यूएस कॅपिटल’वर ट्रम्प समर्थकांनी ६ जानेवारी २०२१ रोजी केलेल्या हल्ल्याची चौकशी अमेरिकन काँग्रेसची एक समिती करत आहे. २०२० च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभव न स्वीकारता ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. तसे करताना त्यांनी कायदा हाती घेतल्याप्रकरणी खटल्यासाठी तपशील गोळा करण्याचे काम सुरू आहे. या समितीच्या उपाध्यक्ष लिझ चेनी यांनी सांगितले, की ट्रम्प यांच्यावरील गुन्हेगारी आरोपांबाबत आपली समिती न्याय विभागाला अनेक संदर्भ पुरवू शकते. ट्रम्प यांनी मात्र या समितीवर लबाडी केल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेस समितीने कोणता तपशील दिला?

दि. २ मार्चला न्यायालयात काँग्रेसच्या या समितीने ट्रम्प यांनी निवडणुकीत केलेल्या गैरप्रकारांचा तपशील दिला होता. या प्रकरणाची चौकशी करणारे कॅलिफोर्नियाचे न्यायाधीश डेव्हिड कार्टर यांनी सांगितले, की ट्रम्प यांच्या कृत्याने संघराज्याच्या कायद्यांचे उल्लंघन झाले आहे. त्यानुसार कोणत्याही सरकारी प्रक्रियेत व्यत्यय आणणे हे बेकायदेशीर कृत्य आहे. समितीने आरोप केला आहे, की ट्रम्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्कालीन उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याव्यतिरिक्त, राज्य निवडणूक अधिकारी, जनता आणि काँग्रेस सदस्यांना २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत गैरप्रकार झाले, हे पटवून देण्याच्या प्रयत्न ट्रम्प यांनी केला. याला कोणताही पुरावा नसल्याच्या ट्रम्प यांच्याच अनेक सहयोगींनी सांगूनही ट्रम्प यांनी हे आरोप केले, असा या समितीचा दावा आहे. समितीला ट्रम्प यांच्यावर संघराज्यविषयक गुन्ह्यांचा आरोप ठेवण्याचा अधिकार नाही. हा निर्णय अॅटर्नी जनरल मेरिक गार्लंड यांच्या नेतृत्वाखालील विधि विभागाने घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांनी सांगितले की विधि विभागासमोर ट्रम्प यांचा भ्रष्ट हेतू सिद्ध करण्याचे आव्हान असेल.

‘‌वायर फ्रॉड’अंतर्गत कोणते आरोप?

ट्रम्प यांचे विरोधक डेमोक्रॅटिक पक्षाच्या काही सदस्यांनी ६ जानेवारीला समितीसमोरील सुनावणीत सांगितले होते, की रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्याचा फसवा दावा न्यायालयात करण्यासाठी समर्थकांकडून सुमारे २५० दशलक्ष डॉलर उभे केले होते. परंतु हे पैसे इतरत्र लपविण्यात आले. फसव्या कारणासाठी निधी उभा करणे अवैध असल्याने ट्रम्प यांच्यावर फसवणुकीचा आरोप लावला जाण्याची शक्यता असल्याचा कायदेतज्ज्ञांचा अंदाज आहे. याला ‘‌वायर फ्रॉड’ म्हटले जाते. अमेरिकेत हा एक गंभीर गुन्हा मानला जातो.

जॉर्जिया निवडणुकीतील गैरप्रकार कोणते?

२०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकण्याच्या कथित प्रयत्नांचाही ट्रम्प यांच्यावर आरोप आहे. जॉर्जिया येथील सरकार पक्षाच्या तपासात समोर आलेल्या पुराव्यांचा विचार करण्यासाठी मे महिन्यामध्ये विशेष पंचांची (स्पेशल ग्रँड ज्यूरी) निवड करण्यात आली होती. ट्रम्प यांनी २ जानेवारी २०२१ रोजी जॉर्जियाचे सचिव व रिपब्लिकन पक्ष सदस्य ब्रॅड रॅफेन्सपर्गर यांना केलेल्या दूरध्वनीच्या तपशfलावर हा तपास केंद्रित आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’कडील ध्वनिफितीनुसार ट्रम्प यांनी रॅफेन्सपर्गर यांना निवडणुकीत नुकसान पोहोचवणारी मते ‘शोधण्यास’ सांगितले. ‌असे करताना ट्रम्प यांनी जॉर्जियातील किमान तीन निवडणूक कायद्यांचे उल्लंघन केले, असे विधिज्ञांचे मत आहे. हे उल्लंघन पुढीलप्रमाणे : निवडणुकीत फसवणुकीचा कट, फसवणुकीस भरीस पाडणारी विनंती आणि निवडणूक प्रक्रियेत हेतुपुरस्सर हस्तक्षेप. यावर ते आपली मुक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य होते व निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा हेतू नसल्याचा ट्रम्प यांचा युक्तिवाद असू शकतो.

न्यूयॉर्क येथील गुन्हेगारी तपास काय आहे?

मॅनहॅटन जिल्हा अधिवक्ता अल्विन ब्रॅग हे ट्रम्प यांच्या स्थावर कंपनीने अपेक्षित बँक कर्ज मिळवण्यासाठी व कमी कर देता यावा, यासाठी ट्रम्प यांच्या मालमत्तेचे मूल्य कमी दाखवले काय, याचा तपास करत आहेत. हा तपास करणाऱ्या दोन वकिलांनी फेब्रुवारीत राजीनामा दिल्याने त्याचे भवितव्य अनिश्चित झाले होते. परंतु ब्रॅग यांच्या कार्यालयाने हा तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले. ब्रॅग हे डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत. त्यामुळे हा तपास राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा ट्रम्प यांचा आरोप असून, अर्थातच त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

अध्यक्षीय उमेदवारावर कारवाई नाही का?

विद्यमान अध्यक्षांवर दोषारोप न करण्याचे अमेरिकेच्या विधि विभागाचे जुने धोरण आहे. अध्यक्षपदाच्या उमेदवारांना मात्र असे कोणतेही कवच दिलेले नाही. मिशिगन विद्यापीठातील विधि विभागाचे प्राध्यापक ब्रायन कल्ट यांनी सांगितले, की अध्यक्षपदाच्या उमेदवारावर खटला चालवण्याचे फक्त राजकीय परिणाम होऊ शकतील. मात्र, या उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखलच करता येणार नाही, अशी कुठलीही घटनात्मक तरतूद नाही. त्यामुळे ट्रम्प जरी आगामी अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून इच्छुक असतील, तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

न्यूयॉर्क अॅटर्नी जनरलची चौकशी काय आहे?

ट्रम्प यांच्या ‘ट्रम्प ऑर्गनायझेशन’ने स्थावर मालमत्तेचे मूल्य वाढवलेले दाखवून फसवणूक केली अथवा नाही याची दिवाणी स्वरूपाची चौकशी न्यूयॉर्कच्या अॅटर्नी जनरल लेटिशिया जेम्स करत आहेत. ट्रम्प आणि त्यांची दोन मुले, डोनाल्ड ट्रम्प ज्यूनियर आणि इव्हांका ट्रम्प यांनी १५ जुलैपासून सुरू झालेल्या चौकशीस सामोरे जाण्यास सहमती दर्शवली. चौकशी करणाऱ्या जेम्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या असल्याने हा तपास राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला असून, हेही आरोप फेटाळले आहेत.

कॅरोल यांचा मानहानीचा खटला काय आहे?

‘एले’ मासिकाच्या पूर्वाश्रमीच्या सदरलेखिका ई. जीन कॅरोल यांच्या आरोपानुसार ट्रम्प यांनी त्यांच्यावर १९९० मध्ये न्यूयॉर्कमधील एका ‘डिपार्टमेंटल स्टोअर’मध्ये अतिप्रसंग केला होता. तत्कालीन अध्यक्ष ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावताना आपल्या पुस्तकाची विक्री वाढवण्यासाठी कॅरोल माझ्यावर खोटे आरोप करत असल्याचा प्रत्यारोप केला होता. त्यामुळे कॅरोल यांनी २०१९ मध्ये ट्रम्प यांच्यावर मानहानीचा दावा केला होता. मॅनहॅटनमधील न्यायालय कॅरोलचा हा खटला चालवावा अथवा नाही, यावर निर्णय देणार आहे. ट्रम्प यांच्या वकिलाच्या युक्तिवादानुसार ट्रम्प यांना संघराज्यीय कायद्याचे संरक्षण आहे. त्यातील तरतुदीनुसार सरकारी व्यक्तींविरुद्ध मानहानीचा दावा करता येत नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained allegations against us former president donald trump fbi raid print exp sgy
First published on: 12-08-2022 at 07:39 IST