राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सोमवारी गँगस्टर छोटा शकीलचा सहकारी सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूटला ताब्यात घेतलं. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संबंधित २१ व्यक्तींच्या २९ ठिकाणांवर एनआयएने सोमवारी सकाळी छापे टाकल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यावेळी गुन्हा सिद्ध करणारी काही कागदपत्रं सापडल्याचं एनआयएने सांगितलं आहे. यानिमित्ताने हा सलीम फ्रूट कोण आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे जाणून घेऊयात….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलीम फ्रूट कोण आहे ?

सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट हा गँगस्टर छोटा शकीलचा साडू आहे. दक्षिण मुंबईत कुटुंबाचा फळं विकण्याचा व्यवसाय असल्याने त्याला सलीम फ्रूट नावाने ओळखलं जातं. दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी म्हणूनही त्याची ओळख आहे. छोटा शकील हा एक कुख्यात गँगस्टर आहे. तो पैसे घेऊन लोकांना मारण्याची सुपारी घेण्याचं काम आपल्या टोळीच्या माध्यमातून चालवत असे. त्याच्यावर खंडणीखोरीचे अनेक गुन्हे देखील दाखल आहेत.

दाऊद प्रकरणात मुंबई परिसरात २९ ठिकाणी छापे ; राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई

छोटा शकील दाऊद इब्राहिमसाठी पाकिस्तानमधून काम करतो. सूत्रांच्या माहितीनुसार, सलीम फ्रूट तीन ते चार वेळा पाकिस्तानमध्ये छोटा शकीलच्या घरी गेला होता.

सलीम फ्रूटविरोधात इतर कोणते गुन्हे?

सलीम फ्रूटविरोधात २००० मध्ये विदेशात शकील आणि दाऊद इब्राहिमसाठी खंडणीचं रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. २००६ मध्ये युएई सरकारने त्याचं भारतात प्रत्यार्पण केलं. छोटा शकीलशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. मोक्काअंतर्गत त्याच्यावर आणि इतरांवर कारवाई करण्यात आली होती. २०१० पर्यंत तो जेलमध्ये होता.

२०१६ मध्ये त्याला पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने २००४ मधील एका प्रकरणात अटक केली. सलीम फ्रूटच्या सहकाऱ्यांनी मध्य मुंबईतील एका डॉक्टरला धमकावून त्याच्याकडून २५ लाखांची खंडणी मागितली होती. नंतर वाटाघाटी करत ही रक्कम १० लाखांवर आणण्यात आली होती. पैसे घेण्यासाठी आले असता क्राइम ब्रांचने दोघांना अटक करत बेड्या ठोकल्या होत्या.

सलीम फ्रूटची याआधी इतर यंत्रणेकडून चौकशी झाली आहे का?

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सक्तवसुली संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक केली. दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या या प्रकरणी तपासादरम्यान ईडीने सलीम फ्रूटची अनेकदा चौकशी केली.

ईडीला दिलेल्या जबाबात सलीम फ्रूटने आपण दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरचा जवळचा सहकारी असल्याचं सांगितंल होतं. अनेक वादग्रस्त भूखंडांच्या व्यवहारांमध्ये मध्यस्थी करून त्यातून पैसे उकळण्याचा व्यवहार हसीना पारकर चालवत असल्याचा दावा केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर देखील हसीना पारकरच्या चालकासोबत संगनमत करून कुर्ल्यातील भूखंड हडप केल्याचा आरोप आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained who is salim fruit detained by nia after raids sgy
First published on: 10-05-2022 at 13:47 IST