कोल्हापूर: रत्नागिरी-नागपूर महामार्गातील चोकाक फाटा ते अंकली या रस्त्याच्या कामासाठी येत्या दोन दिवसात भुसंपादनाबाबतची कार्यवाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होणार आहे. या रस्त्यासाठी होणाऱ्या भूसंपादनासाठी शासनाकडून रेडीरेकनर अथवा बाजारभाव यापेक्षा जी रक्कम जास्त असेल त्याच्या दुप्पटीने मोबदला दिला जाणार आहे. यामुळे चोकाक ते अंकली येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. जोपर्यंत शासनाकडून पुर्वीप्रमाणे चौपट मोबदला दिला जाणार नाही, तोपर्यंत या रस्त्याचे काम सुरू होवू देणार नाही, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी बुधवारी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी शेट्टी म्हणाले कि, मी लोकसभेचा सदस्य असताना रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी तसेच तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, सुशिलकुमार शिंदे, प्रतिक पाटील, जयवंतराव आवळे यांनी सर्वजण विशेष पाठपुरावा करून रत्नागिरी ते नागपूर हा कोल्हापूर-सोलापूर-लातूर ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गाची घोषणा केली. यामधील रत्नागिरी ते नागपूर या मार्गातील चोकाक फाटा ते अंकली हा रस्ता वगळता सर्व रस्त्याच्या भूसंपादनास पुर्वीच्या शासन निर्णयाप्रमाणे चौपटीने मोबदला देण्यात आला आहे.

आणखी वाचा-राजाराम कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना माराहाण प्रकरण, सतेज पाटील समर्थक डॉ. संदीप नेजदार यांच्यासह आठजणांना अटक

काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे चोकाक फाटा ते अंकली भूसंपादन रखडले होते. यामध्ये शेतकऱ्यांचा कोणताच दोष नसून शासनाच्या दिरंगाईमुळे सदरचा २२ किलोमीटरचे भुसंपादन होवू शकले नाही. सध्या चोकाक फाटा ते अंकली येथील नवीन रस्त्याच्या चोकाक, अतिग्रे, माणगावेवाडी, हातकंणगले, मजले, तमदलगे, निमशिरगांव, जैनापूर, उदगांव या गावातील भूसंपादनाची कार्यवाही युध्दपातळीवर सुरू असून येत्या दोन दिवसात सदर मार्गावरील भूसंपादनाची माहिती प्रसिध्द केली जाणार आहे. यामधील बाधित शेतक-यांना शासनाच्या नवीन निर्णयाप्रमाणे दुप्पटीने मोबदला दिला जाणार आहे.

यापूर्वीही शिरोली ते अंकली रस्त्याचे २००८ साली भूसंपादन होत असताना अत्यल्प दराने मोबदला दिला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या मार्गावरील अनेक शेतकऱ्यांची संपु्र्ण जमीन संपादित होणार असून त्यामुळे ते भुमिहीन होणार आहेत. जर शासनाने रत्नागिरी ते नागपूर पर्यंत जो मोबदल्याचा दर शेतकऱ्यांना दिला आहे, तोच दर या शेतकऱ्यांना द्यावा व भूसंपादनाची पुढील तीन ए व तीन डीची कार्यवाही करावी. अन्यथा परिसरातील सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन जनआंदोलन उभारून रस्त्याचे काम बंद पाडणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If farmers do not get four times compensation for land acquisition of ratnagiri nagpur highway will not allow road work to start says raju shetty mrj