दयानंद लिपारे
कोल्हापूर : समृद्ध जैवविविधतेने सह्याद्री घाटाचे महत्त्व जगभर अधोरेखित झाले असले तरी याच घाटात भूस्खलनाचे प्रमाण वाढत चालले आहे. शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागातील अभ्यासकांचे संशोधन याबाबत धोक्याचा इशारा देणारे आहे. याबाबत शासन यंत्रणा पुरेशी दक्ष नसल्याचाही अनुभव आहे.
युनोस्कोने पश्चिम घाटाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केला आहे. गुजरातपासून सुरू होणारा पश्चिम घाट केरळपर्यंत पोहोचतो. महाराष्ट्रातील सह्याद्रीचा घाट याचाच भाग आहे. याच सह्याद्री पर्वतरांगेत भूस्खलनाचे प्रमाण वाढत आहे. याच घाटातील तळीये, पाटण, पोसरे, आंबेघर, कोंडवळे, खडीकोळवण, सुतारवाडी, मुंबई उपनगर आणि आता इरशाळवाडी अशा भूस्खलनाच्या महत्त्वाच्या घटना चर्चेत राहिल्या आहेत. यामध्ये मनुष्य – वित्तहानी मोठय़ा प्रमाणात झाली आहे. डोंगर उतारावर असणाऱ्या लोकवस्ती आणि मानवनिर्मित घटकांवर याचा विपरीत परिणाम होत आहे.
काय सांगतो अभ्यास?
याबाबत शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागातील प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर, प्रा. डॉ. अभिजित पाटील आदींनी केलेले संशोधन भूस्खलनाच्या धोक्याकडे लक्ष वेधणारे आहे. जुलै २०२१ मध्ये त्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ठिकाणी भूस्खलनाचे संशोधन केले. त्यामध्ये १८२३ ठिकाणे भूस्खलन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. उपगृह प्रतिमा, एआय मशीन लर्निग या अद्ययावत तंत्राद्वारे त्यांनी हे संशोधन केले आहे. हा दाट जंगल, अभयारण्याचा भाग असल्याने येथे मानवी वस्ती कमी आहे. तथापि जंगलातील झाडी नष्ट पावत असल्याने त्याचा मलबा/ राडा जलाशयात साचून गाळाचे प्रमाण लक्षणीय वाढत चालले आहे. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभाग आणि शिवाजी विद्यापीठाचा भूगोल विभाग यांनी संयुक्त काम करण्याचे ठरवले आहे.
भूस्खलनाची कारणे कोणती?
पश्चिम घाटामध्ये भूस्खलनाचा धोका असल्याचा इशारा पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी यापूर्वीच दिला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ते कोल्हापूर या भागात अवैध खाणकाम, बेसुमार वृक्षतोड, डोंगर उतारावरील शास्त्रीय शेती, बेकायदेशीर बांधकाम, रस्त्यालगत अशास्त्रीय पाणी निचरा पद्धती, उतारावर विस्फोटकांचा वापर आदी मानवनिर्मित कारणे भूस्खलनास कारणीभूत ठरत आहेत. भूस्खलनाच्या दुर्घटना घडल्या की चर्चेचा धुरळा उडतो आणि यथावकाश तो पुन्हा शांत होत असल्याने निर्णायक कृती होताना दिसत नाही.
धोक्याचा इशारा
भूगोल विभागाने आंबोली घाट ते फोंडा घाट या एका मर्यादित भागांमध्ये होत असलेल्या भूस्खलनाचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये सन २०१४ ते २०१९ पर्यंत अनुक्रमे ६,४,५,१२,१४,१७ अशी संख्या दिसून आली आहे. या नोंदी पाहता पश्चिम घाटात भूस्खलनामध्ये वाढ होत चालल्याचा हा संकेत आहे, असे प्रा. डॉ. अभिजित पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.