How India Won First T20 World Cup 2007 : आयसीसी टी-२० विश्वचषक २००७ चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला होता. या हंगामात भारत आणि पाकिस्तान दोनदा आमनेसामने आले आणि दोन्ही वेळा भारतीय संघ विजयी झाला. भारत-पाकिस्तान यांच्यात जेव्हा जेव्हा सामना होतो तेव्हा त्यात रोमांच भरलेला असतो, मात्र २००७ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात फक्त थरार नव्हता. ॲक्शन, थ्रिलर, एक्साइटमेंट सगळंच या मॅचमध्ये पाहायला मिळालं. हा सामना एक तराजूप्रमाणे झाला होता, जो प्रत्येक क्षणाला बदलत होता. आज आपण या सामन्याचा थरार आणि टीम इंडियाने अंतिम सामना कसा जिंकला? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताने पाकिस्तानला दिले होते १५८ धावांचे लक्ष्य –

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १५७ धावा केल्या. या सामन्यात गौतम गंभीरने ५४ चेंडूत ७५ धावांची शानदार खेळी केली होती. हा सामना सुद्धा महत्वाचा होता कारण याआधी देखील भारत आणि पाकिस्तान या हंगामात आमनेसामने आले होते, जो खूपच रोमांचक झाला होता, ज्यामध्ये टीम इंडियाने ‘बॉल आउट’ नियमाने विजय मिळवला होता. अंतिम सामन्यात गंभीरशिवाय रोहित शर्माने या सामन्यात ३० धावांची खेळी केली होती. या सामन्यात पाकिस्तानकडून उमर गुलने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात २८ धावा देत ३ विकेट्स घेतले. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी १५८ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

शेवटच्या षटकाचा थरार कसा होता?

कर्णधार एमएस धोनी शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी जोगिंदर शर्मावर सोपववली. या षटकात पाकिस्तानला विजयासाठी १४ धावांची गरज होती. मिसबाहने पहिल्या २ चेंडूत २ चौकार मारले होते. आता पाकिस्तानला विजयासाठी ४ चेंडूत ६ धावांची गरज होती. भारताच्या बाजूने जाणारा सामना पुन्हा एकदा उलटला होता. इथून भारत हा सामना हरल्याचे दिसत होते. पण पुढच्याच चेंडूवर जोगिंदर शर्माने मिसबाहला श्रीशांतच्या हाती झेलबाद केले. अशाप्रकारे भारताने पहिलाच टी-२० विश्वचषक जिंकला. भारताने हा रोमहर्षक सामना ५ धावांनी जिंकला.

हेही वाचा – T20 WC 2024 : टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत कसा राहिलाय टीम इंडियाचा प्रवास? जाणून घ्या..

आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची टीम इंडियाला संधी –

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेला २ जून पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ आधीच अमेरिकेत पोहोचला असून संघाने सरावही सुरू केला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात १ जून रोजी सराव सामना खेळवला जाणार आहे. यानंतर टीम इंडियाचा विश्वचषकातील सामना ५ जूनला आयर्लंडशी होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ९ जून रोजी पाकिस्तानशी भिडणार आहे. टी-२० विश्वचषकाचे आतापर्यंत ८ हंगाम खेळले गेले आहेत. यंदा भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपुष्टात आणण्याची संधी आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How team india won the first trophy in 2007 by defeating pakistan team in the final match of t20 world cup vbm