भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने दुबळ्या लंकेला ६२ धावांनी मात देत मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली. श्रीलंकेचा कप्तान दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज इशान किशन (८९) आणि श्रेयस अय्यर (५७) यांच्या वादळी खेळींमुळे भारताने २० षटकात २ बाद १९९ धावा ठोकल्या. भारताकडून अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाने पदार्पण केले. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. चरिथ असलांकाशिवाय (नाबाद ५३) इतर खेळाडू धावा जमवण्यात अपयशी ठरले. त्यांना २० षटकात ६ बाद १३७ धावांपर्यंत पोहोचता आले. इशान किशनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीलंकेचा डाव

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने श्रीलंकेला चांगली सुरुवात करू दिली नाही. त्याने सलामीवीर पाथुन निसांकाची शून्यावर दांडी गुल केली, तर कामिल मिशाराला (१३) रोहितकरवी झेलबाद केले. त्यानंतर व्यंकटेश अय्यरने जेनिथ लियानागेला आणि रवींद्र जडेजाने अनुभवी दिनेश चंडीमलला माघारी धाडत लंकेची अवस्था खिळखिळी केली. १० षटकात श्रीलंकेने ४ बाद ५७ धावा केल्या. पुढच्याच षटकात फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने कप्तान दासुन शनाकाला (३) झेलबाद करत लंकेचे कंबरडे मोडले. एका बाजूने चरिथ असलांकाने किल्ला लढवला. १९व्या षटकात त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले पण त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. २० षटकात श्रीलंका संघ ६ बाद १३७ धावांपर्यंतच पोहोचू शकला. भारताने हा सामना ६२ धावांनी जिंकला. असलांका ५ चौकारांसह ५३ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

हेही वाचा – IPL 2022 : तारीखही ठरली आणि दुसरी खुशखबरही मिळाली..! ‘या’ तारखेपासून रंगणार आयपीएल

भारताचा डाव

रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. मागील काही सामन्यात संथ वाटणाऱ्या इशानने स्फोटक फलंदाजी करत रोहितला साथ दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी १११ धावांची खेळी केली. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराने रोहितचा त्रिफळा उडवत ही भागीदारी मोडली. रोहितने २ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावांची खेळी केली. या धावांसह तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्यानंतर इशानने श्रेयस अय्यरसोबत धावा कुटल्या. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या इशानला लंकेचा कप्तान दासुन शनाकाने माघारी धाडले. इशानने १० चौकार आणि ३ षटकारांसह ८९ धावा ठोकल्या. शेवटच्या काही षटकात श्रेयसने रवींद्र जडेजासोबत धावा जमवल्या. २०व्या षटकात श्रेयसने आपले झटपट अर्धशतक पूर्ण केले. श्रेयसने २८ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावा ठोकल्या. २० षटकात भारताने २ बाद १९९ धावा केल्या.

सूर्यकुमार यादव आणि दीपक चहर हे खेळाडू दुखापत झाल्यामुळे टी-२० मालिकेबाहेर आहेत. केएल राहुलही दुखापतग्रस्त झाला आहे. विराट कोहली, ऋषभ पंत यांना बीसीसीआयने ब्रेक दिला आहे. आता भारताकडे १६ जणांचा संघ आहे.

हेही वाचा – Women’s World Cup : …तर ९ खेळाडूंसह संघाला उतरावं लागणार मैदानात; वाचा ICCचा नवा नियम!

दोन्ही संघांची Playing 11

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, यजुर्वेंद्र चहल.

श्रीलंका : पाथुम निसांका, कामिल मिशारा, चरित असलांका, दिनेश चंडीमल (विकेटकीपर), जेनिथ लियानागे, दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयविक्रमा, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs sri lanka 1st t20 match report adn