पहिल्यांदाच कॉलिफायर सामना खेळणाऱ्या रायझिंग पुणे सुपरजाएंट्सने मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर पराभूत करुन अंतिम फेरी गाठली. गोलंदजीला मैदानात उतरल्यापासून पुण्याचे संघाने सामन्यावर पकड मिळवली होती. ठराविक अंतराने मुंबईच्या फलंदाजांना तंबूत पाठवत अखेर २० धावांनी पुण्याने हा सामना खिशात घातला. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नाणेफेकीचा कौल परतवून लावण्यासाठी पुण्याने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ बाद १६२ धावा केल्या. या माफक वाटणाऱ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईचा संघ निर्धारित २० षटकात  ९ बाद १४२ धावापर्यंत मजल मारु शकला. त्यामुळे पुण्याने हा सामना २० धावांनी जिंकला.पुण्याच्या वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूरच्या प्रभावी माऱ्यासमोर मुंबईची फलंदाजी साफ अपयशी ठरली. दोघांनी प्रत्येकी ३ बळी टिपले. तर जयदेव उनाडकट आणि लॉकी फग्र्युसन यांनी प्रत्येकी एक गडी मिळवून पुण्याच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचे ध्येय घेऊन मैदानात उतरलेल्या पुण्याची सुरुवात खराब झाली. सलामवीर अजिंक्य रहाणे आणि राहुल त्रिपाठी यांनी पुण्याच्या डावाला सुरुवात केली. राहुल त्रिपाठी मिचेल मॅक्क्लिनॅघनच्या गोलंदाजीवर स्वस्तात परतला. धाव फलकावर अवघ्या ६ धावा असताना पुण्याचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ मैदानात उतरला. मात्र, तो एका धावेची भर करुन मलिंगाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. हार्दिक पांड्याने त्याचा सुरेख झेल टिपला. पुण्याची अवस्था केविलवाणी झाली असताना सलामवीर अजिंक्य रहाणेने मनोज तिवारीच्या साथीने पुण्याच्या डावाला आकार दिला. रहाणेने ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे पुणे आव्हानात्मक धावसंख्या उभारेल, असे वाटत असताना कर्ण शर्माने रहाणेला पायचित केले. त्यानंतर यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनी नाबाद (४०) तर मनोज तिवारीच्या (५८) खेळीच्या जोरावर पुण्याने निर्धारित २० षटकात ४ बाद १६२ धावा केल्या. मुंबईकडून मॅक्क्लिनॅघन ,कर्ण शर्मा आणि मलिंगाने प्रत्येकी एक बळी मिळवला. सलमामवीर पार्थिव पटेल शिवाय मुंबईच्या एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. पटेलने एकाकी झुंज देत ४० चेंडूत ५२ धावांची खेळी केली. मुंबईला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असला तरी अंतिम सामन्यात पोहोचण्याची त्यांना आणखी  एक संधी आहे.

गुरुवारी हैदराबाद सनरायझर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात बाद फेरीतील सामना खेळविण्यात येणार आहे. या सामन्यात पराभव होणाऱ्याचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येईल. तर विजयी मिळविणारा संघ शुक्रवारी बंगळुरुच्या मैदानावर मुंबईला टक्कर देईल. त्यामुळे मुंबईचा दुसऱ्या कॉलिफायरमधील सामना कोणाशी होतोय यासोबतच दुसऱ्या संधीत मुंबई पुन्हा अंतिम सामन्यात मजल मारण्यात यशस्वी होणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Live cricket score mi vs rps mumbai indians vs rising pune supergiant match updates wankhede