IND vs ENG Shreyas Iyer: भारत वि इंग्लंड पहिल्या वनडेमध्ये श्रेयस अय्यरने आक्रमक खेळी करत तुफानी फटकेबाजी केली. श्रेयस अय्यरने वादळी फलंदाजीसह भारतीय संघात दणक्यात पुनरागमन केले. भारताने १९ धावांवर २ विकेट्स गमावल्यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजीला आला आणि येताच आर्चरच्या षटकात दोन गगनचुंबी षटकार लगावत सुरूवात केली. अय्यरने ३६ चेंडूत २ षटकार आणि ९ चौकारांसह ५९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण खरंतर श्रेयस अय्यर नागपूर वनडे सामन्यात खेळणारच नव्हता, असा धक्कादायक खुलासा त्याने केला.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

यशस्वी जैस्वालने वनडे क्रिकेटमध्ये या पहिल्याच वनडे सामन्यातून पदार्पण केले आणि फलंदाजीच्या वेळेस रोहित शर्माबरोबर सलामीला उतरला. विराट कोहलीला दुखापत झाली असल्याने यशस्वीला पदार्पणाची संधी मिळाली, असा सर्वांचा समज होता. पण खरंतर जैस्वाल रोहितबरोबर सलामीला उतरणार, शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आणि विराट चौथ्या क्रमांकावर खेळणार हे आधीच नक्की झालं होतं. शिवाय श्रेयस अय्यर पहिल्या वनडे सामन्यात खेळणारदेखील नव्हता, याची माहिती स्वत: श्रेयसने दिली आहे.

सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना श्रेयस अय्यरने सांगितले की, कर्णधार रोहित शर्माने त्याला सामन्याच्या आदल्या रात्री सांगितले की तो नागपूर वनडे सामना खेळणार आहे. अय्यर म्हणाला, “हा खरंतर एक विनोदी किस्सा आहे. मी काल रात्री (५ फेब्रुवारी) चित्रपट पाहत होतो आणि मी विचार केला रात्री थोडावेळ अजून चित्रपट पाहत बसेन. पण तितक्यात रात्री कॅप्टनचा कॉल आला आणि त्याने सांगितलं की तू नागपूर वनडे सामन्यात खेळू शकतो, कारण विराटच्या गुडघ्याला सूज आली आहे. त्यानंतर मी लगेच माझ्या खोलीत गेलो आणि सरळ झोपलो.”

श्रेयस अय्यरने गेल्या १० एकदिवसीय डावात ६०.६ च्या सरासरीने आणि १२७ च्या स्ट्राईक रेटने ५४५ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतकं आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. या कामगिरीनंतर त्याचे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान निश्चित न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. पण श्रेयसने आता पहिल्याच वनडे सामन्यात संधी मिळताच आपली जबाबदारी चोख बजावली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas iyer reveals how he replaces virat kohli on rohit sharma phone call in india playing xi of ind vs eng 1st odi bdg