‘नरेंद्र’ भगवी वस्त्रे परिधान करून विवेकानंद झाला आणि त्याने जगभरात राजयोगावर निरूपण केले. आता दिल्लीच्या तख्तावर स्वारी करण्यासाठी निघालेल्या मोदीरूपी ‘नरेंद्रा’च्या ‘राजयोगासाठी’ योगगुरू सरसावले आहेत. या भगव्या वस्त्राच्या ‘रेशीम’गाठी ‘भागवता’चा नायक असलेल्या मन‘मोहन’ श्रीकृष्णाने गुंफल्या आहेत.
योगगुरू बाबा रामदेव आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा देशभरातील भक्तपरिवार खूप मोठा आहे. त्यांचे व्याख्यान कोठेही असले, तरी हजारोंची गर्दी होते. धर्मकारण करीत असताना राजकारण करण्याचा प्रयत्न केल्यावर बाबा रामदेव यांना त्रास झाला. दिल्लीतील त्यांचे आंदोलन बळाचा वापर करून काँग्रेसकडून दडपले गेले. त्यानंतर ते कट्टर काँग्रेसविरोधी झाले आणि भाजपवरही नाराज झाले. मात्र त्यांची नाराजी दूर करण्यासाठी संघाच्या नेतृत्वाने प्रयत्न केले आणि ते सफलही झाल्याचे समजते.
बाबा रामदेव नुकतेच विदर्भ दौऱ्यावर होते. त्यांचे नागपूरमध्ये योगदीक्षा व राष्ट्रनिर्माण संमेलन झाले. गरिबी, बेरोजगारी, महागाई, विदेशातील काळा पैसा या मुद्दय़ांचा उल्लेख करून काँग्रेसवर टीकास्त्र सोडत घरोघरी जाऊन देश सुधारण्यासाठी मतदारजागृती करण्याचे आवाहन रामदेव बाबा यांनी केले.
श्री श्री रविशंकर हेही त्याचवेळी विदर्भात होते आणि नागपूरला रेशीमबागेत त्यांचा कार्यक्रम झाला . धर्म नाही, तर विकासाच्या मुद्दय़ावर मत देण्याचे आवाहन त्यांनी केले. कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव न घेता नि:ष्पक्षपणे मतदान करावे, असे त्यांनी सूचित केले. भक्तगणांवर प्रभाव असलेल्या या आध्यात्मिक गुरूंनी भाजपसाठी थेट प्रचार केला नाही, तरी काँग्रेसवर टीकास्त्र सोडून अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल, अशी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी देशभरात त्यांची संमेलने व कार्यक्रम होणार आहेत. धर्मगुरुंचा आशीर्वाद लाभल्याने मोदीरूपी ‘नरेंद्र’ राजयोग सुफळ संपूर्ण होण्याची सुचिन्हे भाजपला वाटत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2014 रोजी प्रकाशित
‘नरेंद्रा’च्या राजयोगासाठी योगगुरूंच्या ‘रेशीम’गाठी
‘नरेंद्र’ भगवी वस्त्रे परिधान करून विवेकानंद झाला आणि त्याने जगभरात राजयोगावर निरूपण केले. आता दिल्लीच्या तख्तावर स्वारी करण्यासाठी निघालेल्या मोदीरूपी ‘नरेंद्रा’च्या ‘राजयोगासाठी’ योगगुरू सरसावले आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-04-2014 at 03:25 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga gurus become active for making narendra modi prime minister