विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे जवळपास ३० हून अधिक आमदारांना घेऊन सुरतला रवाना झाले होते. त्यानंतर सुरतवरून त्यांनी सर्व आमदारांचा मुक्काम मुंबईपासून जवळपास २७०० किमी दूर आसाममधील गुवाहाटी येथे हलवला आहे. बुधवारी मध्यरात्रीच ते सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटीला रवाना झाले. त्यामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्वरित सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले होते. पण त्यांच्या आदेशाला न जुमानता शिवसेनेच्या दोन आमदारांसह ३ अपक्ष आमदार गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह योगेश कदम, मंजुळा गावीत, माधुरी मिसाळ आणि गोपाळ दळवी यांचा समावेश असल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे.

विशेष म्हणजे, मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी मुंबईला बोलावलं होतं. मी मुंबईला येतोय, असं सांगून पाटील आज सकाळी जळगावहून सुरतला गेले आणि तेथून थेट गुवाहाटीला रवाना झाले आहेत. चंद्रकांत पाटील आणि योगेश दळवी चार्टर्ड विमानाने गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. पाच नवीन आमदार गुवाहाटीला रवाना झाल्याने एकनाथ शिंदे यांचं संख्याबळ आणखी वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी अल्पमतात जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- “सेनेला संपवल्याचा राऊतांना आनंद झाला असेल”, नारायण राणेंची बोचरी टीका, म्हणाले…

एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी एक पत्र जारी केलं आहे. त्यामध्ये एकूण ३४ आमदारांच्या सह्या आहेत. त्यामध्ये चार नावं अपक्ष आमदारांची आहेत. याशिवाय अकोल्याला परत आलेले बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांची देखील संबंधित पत्रावर सही आहे. आता आणखी पाच आमदार गुवाहाटीला रवाना झाल्याने शिंदे यांची ताकद वाढणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 more mla of mahavikas aghadi went guwahati eknath shinde uddhav thackeray chandrakant patil madhuri misal rmm