देशात पहिलं उदाहरण आहे, मूळ शिवसेना मालकाच्या हातून काढली आहे. ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना नेऊन शिवसेना दिली आहे. पण, हा लोकशाहीला मारक निर्णय आहे. संपूर्ण देशाला या निर्णयाचे परिणाम भविष्यात भोगावे लागणार आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनीही निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली आहे, असं शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिंदे गट ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावणार आहे, याबद्दल विचारलं असताना भास्कर जाधव म्हणाले, “एखाद्या माणसाची भूक किती असावी. शिवसेना पक्ष आणि निशाणी चोरली आहे. आता अजेंडा सुद्धा चोरायचा आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंबरोबर निष्ठेने राहिलेल्या आमदारांना निलंबीत करून जर कोणाची भूक भागत असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. ज्यांची भूक भागत नसते, त्यांना भस्म्या रोग झाला आहे, असं म्हणतात. ज्यांना भस्म्या रोग झाला आहे, त्यांना शिवसेनेची प्रत्येक गोष्ट गिळायची आहे.”

योगेश कदम यांच्याविरोधात कट रचण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत, असा आरोप रामदास कदम यांनी केला. याबद्दल विचारलं असता भास्कर जाधव यांनी म्हटलं, “रामदास कदमांसारखा बेवडा दुसरा काही बोलू शकतो का? त्यांना तेवढीच अक्कल आहे.”

हेही वाचा : शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्यामागे मोठ्या शक्तीचा हात? शरद पवार म्हणाले, “याच्या पाठीमागे…”

संजय राऊतांनी त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे, यावर भास्कर जाधव यांनी सांगितलं की, “देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री या नात्याने संजय राऊतांच्या पत्राची गंभीर दखल घेऊन चौकशी करायला हवी होती. पण, त्यांनी त्या पत्राची टिंगल-टवाळी केली आहे. ‘स्टंटबाजी आणि सुरक्षा मिळवण्यासाठी पत्र लिहलं आहे,’ असं फडणवीस म्हणाले. मात्र, देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलत आहेत.”

हेही वाचा : “सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला”, निवडणूक आयोगावरील याचिका स्वीकारल्यानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

“रात्री बारा-साडेबारा वाजता माझी सुरक्षा काढण्यात आली. आणि एक तासात चिपळूणमधील माझ्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकून घर जाळण्याचा प्रयत्न केला. आमदार फोडून तुमचं समाधान झालं नाही. आमची घरं जाळून तुमचं समाधान होणार आहे का?,” असा संतप्त सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav attacks ramdas kadam over uddhav thackeray allegation ssa