दसऱ्याच्या निमित्ताने भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवानगडवर आयोजित मेळाव्याला उपस्थिती लावली. पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने भगवानगडावर दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव केला. मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी फुलं टाकत नव्हते, तर भगवानदादांसाठी आणि तुमच्यासाठी वाहत होते असं म्हटलं. ही दसऱ्याची जी भक्ती आणि शक्तीची जी परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी घऱची पुरणपोळी सोडून आले आहात सांगत पंकजा मुंडे यांनी उफस्थितांचे आभार मानले. देशात असा सोहळा कुठे होत नसेल असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आपण जिथे जन्म घेतला त्या मातीचा, जातीचा आपल्याला कधी कमीपणा नाही वाटला पाहिजे अशी गोपीनाथ मुंडेंची शिकवण आहे. राजघराणं असो किंवा वंचितांमध्ये जन्म झालेला असो लाज वाटली नाही पाहिजे. आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्यासाठी ही परंपरा उभी केली आहे. कोणत्या पक्षाचं, मतांचं राजकारण नाही, तर सामान्यांची चळवळ येथून उठत आहे, जी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाते,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

मेळाव्याला येण्याआधी पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर उड्डाण केल्यानंतर पुन्हा लँडिंग करण्यात आलं होतं. याबद्दल बोलताना त्यांनी मला वाटलं कोणाची दृष्टी लागली मेळाव्याला असा मिश्किल टोला लगावला. मला वाटलं मी येऊ शकणार नाही असं सांगत पंकजा मुंडे यांनी पण नंतर मी विचार केला तुम्ही मला कधीपर्यंत रोखणार? म्हणत कविता वाचून दाखवली.

मला काहीजणांनी सत्ता नाही म्हणून मेळावा नको सांगितलं. पण मी नकार दिला. कोणी म्हटलं अतिवृष्टी, करोना आहे. मी म्हटलं अशावेळीच तर लोकांना ऊर्जा देण्यासाठी मेळाव्याची गरज आहे सांगितलं असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

“पंकजाताई घरात बसलेत म्हणून खूश झालेल्यांनी माझा दौरा लिहून घ्या. मी दिल्ली, नवी मुंबई, नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहे. ऊसाच्या फडात जाऊन संवाद साधणार आहे. लोकांना करोनामध्ये बेड, औषधं मिळत नव्हती. त्यावेळी मी दौरे करायला हवे होते का? तुमची काळजी वाटली म्हणून दौरे नाही केले. पण घऱात बसून नव्हते…कोविड सेंटर सुरु केले होते. घरोघरी आम्ही डबे पोहोचवले,” अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.

“सरकारने नुसतं पॅकेज जाहीर करुन चालणार नाही, प्रत्येकाच्या हातात मदत द्यावी आणि दिवाळी गोड करावी. फक्त मोदींचे तेवढे पैसे येत आहेत. पण राज्य सरकारचे, पालकमंत्र्यांचे आले का? पण असं काही बोललं की यांना राग येतो. आता तुम्ही सत्तेत आहात तर तुम्हाला विचारणार ना…तुम्ही विरोधात होता तेव्हा तर धमक्या देत होतात,” अशी टीका पंकजा मुंडेंनी केली.

“राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांवर अत्याचर, बलात्कार होत आहेत…महिलांकडे वाकडी नजर करुन जरी पाहिलं तर डोळे काढून घेणाऱ्याची ही भूमी आहे. हत्तीच्या पायाखाली दिलं पाहिजे. राज्यात काय चाललंय काय? त्यावर बोलायचं नाही…आरोपींवर बोलायचं नाही. सरकार जर असं काम करत असेल तर जाब विचारायचा की नाही?,” अशी विचारणा पंकजा मुंडेंनी केली.

“ऊसतोड कामगार मंडळाचं काय झालं असं मला विचारतात. पण मला जसं हवं होतं आणि ज्या वेगाने हवं होतं तसं ऊसतोड कामगार मंडळ झालं नाही हे मान्य करते. पण आज नोंदणी सुरु झाली आहे. त्याची पायाभरणी आपण केली आहे,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. तसंच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण सर्वांसाठी मी आवाज उठवणार आहे असं जाहीर करताना पंकजा मुंडे यांनी मराठा समाज-ओबीसी समाजात भांडण लावल्याचं कटकारस्थान रचलं जात आहे असा आरोप केला. दोन्ही मिळूनच बहुजन समाज आहे आहे सांगताना त्यांनी एकत्र आणून वज्रमूट करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.

पंकजा मुंडे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे आपलं लक्ष लागलं आहे सांगताना जनहितार्थ घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तीन पक्षांचं सरकार असून एकमेकांना खूश करण्यासाठी जनतेला दुखी केलं जात आहे अशी टीका त्यांनी केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाजपालाही घऱचा आहेर दिला. “मी माझ्या पक्षाच्या लोकांनाही सांगणार आहे. प्रत्येक नेता उठतो आणि हे सरकार पडणार आहे असं सांगतो. आणि प्रत्येत सत्ताधारी आमचं सरकार खंबीर आहे सांगतो. पण तुम्ही सरकार पडणार आणि नाही पडणार यातून बाहेर पडणार आहात की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतोय, सरकार पडणं आणि सरकार खंबीर असणं आमचं ध्येय नाही तर जनतेसाठी काय करतात ते सांगा. राजकारणातील गुन्हेगारीकरण संपुष्टात आणताना विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात रान उठवलं होतं तेव्हा सत्तापरिवर्तन झालं होतं. त्यामुळे विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी आपापल्या भूमिकेकडे आणि जनतेच्या भल्याकडे लक्ष दिलं पाहिजे,” असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.

पंकजा मुंडे यांनी यावेळी मराठा आरक्षण मिळेपर्यंत मी गळ्यात हार घालणार नाही असं जाीर केलं. याआधी त्यांनी ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत फेटा नेसणार नसल्याचं जाहीर केलं होतं. पंकजा मुंडेंनी यावेळी उपस्थितांना व्यसन न कऱण्याचं आवाहन केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp pankaja mude bhagvangad melava sgy