राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी हालचाली करायला सुरुवात केली आहे. एकीकडे भाजपा-शिंदे गटाकडून मोठ्या विजयाचा दावा केला जात असताना दुसरीकडे मोदींविरोधी आघाडीसाठी विरोधी पक्षांच्या मुंबईत भेटीगाठी चालू आहेत. राज्यात नागनाथ-सापनाथ एकत्र झाले तरी मोदींचा पराभव अशक्य म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांनी टीका करत प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावर आता मुनगंटीवारांकडून टीकास्र सोडण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय झाला शाब्दिक वाद?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका करताना खोचक टोला लगावला होता. “राज्यात सापनाथ-नागनाथ एकत्र झाले तरी नरेंद्र मोदींचा पराभव करू शकणार नाहीत”, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. त्यावर बोलताना “नागनाथ-सापनाथ यांची इथे पूजा केली जाते. तुम्ही हिंदू आहात ना?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. यावर पुन्हा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

सुधीर मुनगंटीवार यांनी यावर बोलताना उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. “शाब्दिक कोट्या करण्यात अर्थ नाही. पण हे दोघं एक झाले, तरी याचा उपयोग नाही. उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत कधी उत्तर दिलं का? दोन वर्षं आठ महिने ते राज्याचे मुख्यमंत्री होते. काय केली त्यांनी राज्याची अवस्था? आर्थिक अवस्था वाईट आहे. लोकांशी खोटं बोलायचं, शेतकऱ्यांशी खोटं बोलायचं. हा यांचा मूळ स्वभाव आहे. यांची जुनी भाषणं काढा. म्हणाले २५ वर्षं आम्ही भाजपाबरोबर सडलो. पुन्हा भाजपासोबत युती केली”, असं मुनगंटीवार माध्यमांना म्हणाले.

“देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात सत्तेची खूप मस्ती , त्यांना…”, ठाकरे गटाच्या खासदाराची सडकून टीका

“४० आमदार बाहेर पडतात, काहीतरी दोष असेल ना?”

“उद्धव ठाकरेंना पक्षाचे आमदारही टिकवता येत नाहीत. यांनी खरंतर राजकारणात राहून काय करायचंय? ना जनतेचा विश्वास संपादन करता येत, ना जनतेचा विकास करता येत. शिवसेनेत ४० आमदार फुटतात, काहीतरी दोष असेल ना? तुमचा काहीच दोष नाही का? विचारांचा दोष नक्कीच नाही, दोष तुमच्या कृतीचा आहे. आचरणाचा आहे. तुम्ही ज्या वृत्तीने वागता त्याचा दोष आहे. आता केजरीवालांबरोबर गेलात तर तुम्हाला विश्वासानं सांगतो, यांचे बरेच आमदार आता बाहेर निघतील. कारण यांच्या स्वभावाला कुणी टिकूच शकत नाही”, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं.

दरम्यान, बाळासाहेबांबद्दल आम्हाला फडणवीसांकडून शिकण्याची वाईट वेळ अजून आलेली नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला होता. त्यावर बोलताना मुनगंटीवारांनी प्रतिटोला लगावला. “आम्ही कुठे म्हणतो फडणवीसांकडून शिका. पण बाळासाहेबांकडून तर शिका. तेही शिकण्याची तयारी नाही. देवानं मुद्दाम तर तुम्हाला कान बंद करता येत नाही अशी व्यवस्था केली. तुम्ही तर कान बंद करून बसता”, असं मुनगंटीवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp sudhir mungantiwar slams uddhav thackeray sanjay raut on devendra fadnavis pmw