केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कामाच्या धडाक्यासाठी आणि दिलखुलास स्वभावासाठी ओळखले जातात. नितीन गडकरींनी रस्ते वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रात सुधारणा आणि वेग येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामं पूर्ण केल्याची ख्याती आहे. मात्र, देशभरात हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते बांधणाऱ्या नितीन गडकरींना नागपुरातील त्यांच्याच घरासमोरचा अवघा दोन किलोमीटर लांबीचा रस्ता बांधता येत नसल्याचं कुणी सांगितलं, तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. कारण खुद्द नितीन गडकरींनीच यासंदर्भातला किस्सा काल नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सहा वर्ष घरी गेलो नाही”

नागपूरमधील महल परिसरामध्ये नितीन गडकरींचं घर आहे. पण गडकरी म्हणतात, मी ६ वर्ष झाले माझ्या घरी जात नाही, बाहेर राहातो. आणि याचं कारण खुद्द गडकरींनीच सांगितलं आहे. तिथला रस्ता बांधण्यात आपण हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही अपयशच येत असल्याचं ते म्हणाले आहेत.

दोन किलोमीटरच्या रस्त्याची कहाणी!

एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये नितीन गडकरी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, “मी गेल्या काही दिवसांत नागपुरात राहातच नाही. काही वर्षांपूर्वी नागपुरातील वर्धा रोडवर डिफेन्सची लाईन होती. तेव्हा ती ३५ हेक्टर जागा मी डिफेन्सकडून अडीच कोटी रुपयांत मिळवली. हाफीज काँट्रॅक्टरनी रस्त्याचं आणि तिथल्या कामाचं डिझाईन तयार केलं. पण या कामानंतर तो मला म्हणाला, साहेब, तुम्ही म्हणाल तर आठव्या माळ्यावरून उडी मारेन, पण यानंतर मला कुठलं महानगरपालिकेचं काम करायला नका सांगू. म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये काम करणाऱ्याला नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे”, अशी आठवण गडकरींनी यावेळी सांगितली.

“दोन किमीचा रस्ता करता करता थकून गेलो”

डिफेन्सच्या याच जागेपर्यंत जाण्यासाठीचा आपल्या घरासमोरून जाणारा दोन किलोमीटरचा रस्ता बांधता बांधता आपण थकून गेल्याची आठवण गडकरींनी यावेळी सांगितली. “मी कधी थकत नाही. पण मला कधी कधी वाटतं आपणहे काम करावं की नाही करावं. मी एक लाख कोटी रुपयांचा दिल्ली-मुंबई हायवे जमीन अधिग्रहण करून जवळपास पूर्ण केला. पण माझ्या घरासमोरचा मुधोजीराजे दोन किलोमीटरचा रस्ता करता करता पार थकून गेलो. मी ६ वर्ष झाले महालात नाही गेलो. मी बाहेरच राहातो. त्या रस्त्याच्या कामाबाबत न्यायालयात अनेकदा अर्ज जातात आणि न्यायालयातून त्याला स्थगिती येते”, असं गडकरी यावेळी म्हणाले.

लवकरच बस हवेत उडताना दिसणार; नितीन गडकरींची घोषणा; म्हणाले, “माझ्याकडे पैशांची कमी नाही, करोडोंमध्ये…”

“एक लाख कोटी रुपयांचा रस्ता दोन वर्षांत झाला, पण हा दोन किलोमीटरचा रस्ता करता करता पुऱ्या धापा टाकून थकवून टाकलं. अजून काही काम होत नाही”, अशी मिश्किल टिप्पणी देखील त्यांनी यावेळी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cabinet minister nitin gadkari on road issue newar his home in mahal area nagpur pmw