राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या आठवड्यात अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात भाषण करताना मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास कडाडून विरोध दर्शवला. भुजबळांनी त्यावेळी कोल्हापूरमधील नाभिक समाजातील एका तरूणाबरोबर झालेल्या कथित घटनेचा उल्लेख करून नाभिक समाजाला मराठा समाजावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं होतं. नाभिकांनी मराठ्यांच्या दाढ्या करू नये, केस कापू नये असं आवाहन केलं होतं. भुजबळांच्या या आवाहनानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली. त्यानंतर भुजबळ यांनी याप्रकरणी स्पष्टीकरणही दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच जरांगे पाटील म्हणाले, भुजबळ अशी वक्तव्ये करत राहिले तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही ते निवडून येणार नाहीत. यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख करत भुजबळ म्हणाले, त्या जरांगेला जाऊन सांगा, तू आधी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभा राहा आणि निवडून येऊन दाखव. तू आधी नीट उभा राहा मग बोल.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मी २५ वर्षे मुंबई महापालिकेत होतो. दोन वेळा मुंबईचा महापौर झालो आहे. तसेच दोन वेळा मुंबईतून आमदार म्हणून निवडून आलो आहे. त्यानंतर चार वेळा येवल्यातून आमदार म्हणून निवडून आलो. उगीच काहीही वक्तव्ये करू नको.

हे ही वाचा >> पुण्यातील कुख्यात गुंडाचा एकनाथ शिंदेंबरोबर फोटो? संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री आणि अजित पवारांचा मुलगा…”,

मनोज जरांगे ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप भुजबळ यांनी यावेळी केला. तसेच ते म्हणाले, मनोज जरांगे आमच्यात फूट पाडण्यासाठी काहीही वक्तव्ये करतो. कधी म्हणतो मी धनगरांची बाजू लढणार, तर कधी नाभिकांच्या बाजूने लढणार. परंतु, तू आणि तुझे सहकारी आमच्या आरक्षणावर डल्ला मारताय ते आधी थांबव. तू आमच्या आरक्षणावर डल्ला मारणं थांबवलंस, ओबीसी समाजातून आरक्षण घेण्यासाठी चालवलेला प्रयत्न थांबवलास तर तुझे आमच्यावर खूप उपकार होतील. तू तुझी मागणी मागे घे, तसं केल्यास ओबीसी समाज तुझे उपकार मान्य करेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal asks manoj jarange to withdraw demand for maratha reservation from obc asc
First published on: 06-02-2024 at 14:12 IST