सांगली : गेल्या दोन दिवसांच्या ढगाळ हवामानानंतर मंगळवारी दुपारी ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. मध्यरात्रीही मिरज पूर्व भागासह तासगाव तालुक्याच्या काही भागात विजेच्या कडकडाटासह दमदार अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसाने रब्बी पिकांना दिलासा दिला असला तरी द्राक्ष, उस, भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी मध्यरात्री मिरज पूर्व भागातील मालगाव, खंडेराजुरी, भोसे, कळंबी, कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण, बोरगाव, तासगाव तालुक्यातील अंजनी, गव्हाण, मणेराजुरी, सावळज परिसरात अवकाळी पावसाने थैमान घातले. तर दुपारी सांगली, मिरजेसह पूर्व भागासह आरग, बेडग, लिंगणूर खटाव परिसरात पावसाने हजेरी लावली.

हेही वाचा – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता

अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील शाळू, हरभरा, करडई, गहू या पिकांना पोषक स्थिती निर्माण झाली असली तरी द्राक्ष, उस, भाजीपाला यांना हा अवकाळी पाऊस हानी पोहचवणारा ठरला आहे. द्राक्षामधील अनुष्का, माणिक चमन या जाती या अवकाळीने घडकुजीला बळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर फुलोर्‍यातील द्राक्ष मणी दावण्यासारख्या बुरशीजन्य रोगाला बळी पडण्याचा धोका बळावला आहे. पावसानंतर आज सकाळपासून द्राक्ष बागामध्ये पंपाद्बारे महागड्या औषधांची फवारणी करण्यात येत होती.

हेही वाचा – ‘आवाहन…’, शरद पवारांचं खुलं पत्र; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख करून म्हणाले…

अवकाळी पावसाने सांगली मिरज शहरात पादचारी व वाहनधारकांचीही तारांबळ उडाली. पदपथावर विक्री करणार्‍यांची माल पावसापासून वाचविण्यासाठी मोठी धांदल उडाली. तसेच मिरज तालुक्यातील मालगाव येथील बावाफन उरूस आणि इस्लामपूर येथील संभूआप्पा उरूस आजपासून सुरू झाला असून उरूसासाठी लावण्यात आलेल्या फिरत्या दुकानदारांचीही पावसाने धांदल उडाली. पावसाने यात्रेकरूच बाहेर पडणार नसतील तर व्यवसाय होणारच नाही अशी शंका एका विक्रेत्याने व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy unseasonal rain accompanied by lightning in some parts of tasgaon taluka including miraj east has raised the anxiety of grape growers ssb