गेल्या दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या आदेशांची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. ३१ डिसेंबरपर्यंत शिवसेवेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सुनावणीमध्ये चालढकल केली जात असल्याच्या विरोधकांच्या टीकेला बळ मिळालं असून त्यावरून राहुल नार्वेकरांविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भात माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकरांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहेत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश?

राहुल नार्वेकरांकडून फेब्रुवारी महिन्यापर्यंत आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल देण्यासाठी मुदत मागण्यात आली होती. मात्र, त्यानंतर लगेच लोकसभा निवडणुका लागत असल्याची बाब शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिली. त्यानुसार न्यायालयाने शिवसेनेतील आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल ३१ डिसेंबरपर्यंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल ३१ जानेवारीपर्यंत देण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.

उद्धव ठाकरेंचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मंगळवारी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल नार्वेकरांवर टीकास्र सोडलं होतं. “राहुल नार्वेकर म्हणतात त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झालेली नाही. मी शिवसेनेच्या आमदारांना सांगेन की त्यांनी ही प्रत राहुल नार्वेकरांना नेऊन द्यावी”, असं उद्धव ठाकरे मंगळवारी म्हणाले होते.

राहुल नार्वेकरांचं प्रत्युत्तर

आपल्यावरील आरोप हे दबाव टाकण्याचा प्रकार असल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. “ज्यावेळी मला या आदेशासंदर्भात विचारलं गेलं, तेव्हा माझ्याकडे त्या आदेशाची प्रत नव्हती. ती संध्याकाळी अपलोड झाली. आता उद्धव ठाकरेंना ही प्रत आधी मिळाली असेल, तर त्याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा. आता उद्या सुनावणी असेल तेव्हा पुढील कार्यवाहीबाबत माहिती दिली जाईल”, असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.

Video: “…तर मी आत्ता मोदींना भेटायला जातो”, उद्धव ठाकरेंनी दाखवली तयारी; ठेवली ‘ही’ अट!

“विधानसभा अध्यक्षांबद्दल बेजबाबदार टीका करण्यामागे एक मोडस ऑपरेंडी आहे. विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणून आपल्याला हवा तसा निर्णय करून घेणं हा यामागचा हेतू आहे. पण मी अशा दबावाला बळी पडत नाही. त्यामुळे ज्यांना हा प्रयत्न करायचा आहे त्यांनी करावा”, अशा शब्दांत राहुल नार्वेकरांनी विरोधकांना सुनावलं आहे. “सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर संध्याकाळी ७ नंतर ती वेबसाईटवर अपलोड झाली. त्यानंतर ती मला मिळाली. त्यावरून अशा कमेंट्स केल्या जात आहेत. त्यांना जर आदेशाची प्रत इतरांपेक्षा आधी मिळाली असेल, तर त्यांनी तो खुलासा करावा. हेतुपुरस्सर केली जाणारी टीका म्हणजे फक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे”, असंही नार्वेकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly speaker rahul narvekar on uddhav thackeray mla disqualification pmw