मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते राज्यभरात ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. काही ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी एका कथित फोनकॉलवर मराठा आंदोलनाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामुळे संतप्त जमावाने प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. एवढंच नव्हे तर आंदोलकांनी आमदार सोळंके यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या सर्व वाहनांना आग लावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३००-४०० मराठा आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला केल्याचं बोललं जात होतं. आंदोलकांनी सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडून सर्व वाहनं जाळली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता. या हल्ल्यानंतर आतापर्यंत पोलिसांनी २१ जणांना अटक केली आहे. दरम्यान, प्रकाश सोळंके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

प्रकाश सोळंके म्हणाले, माझ्या घरावर हल्ला करण्यासाठी आलेल्या ४ ते ५ हजार लोकांच्या जमावापैकी २०० ते २५० लोक हे समाजकंटक होते. त्यापैकी बहुसंख्य हल्लेखोर हे अवैध धंदा करणारे होते. यात माझे राजकीय विरोधकही होते. या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत जवळजवळ २१ लोकांना अटक केली आहे. त्यातले ८ आरोपी हे मराठा समाजाचे नाहीत. मराठ्यांव्यतिरिक्त इतरही जाती-धर्माचे लोक या हल्लेखोरांमध्ये होते.

हे ही वाचा >> “जाळपोळ करणारे सत्ताधारी पक्षातील लोक, हे थांबवा अन्यथा…”, जरांगे-पाटलांचं विधान

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, हल्लेखोर पूर्ण तयारीनिशी आले होते. त्यांच्या तयारीवरून मला असं वाटतंय की त्यांचा थेट हेतू दगडफेक आणि जाळपोळ करण्याबरोबरच माझ्या जीविताला हानी पोहोचवण्याचा होता. मला मारण्याचा कट रचूनच ते तिथे आले होते. परंतु, हल्लेखोर माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. हा हल्ला जेव्हा झाला तेव्हा मी माझ्या घरात होतो. सुदैवाने माझ्या कुटुंबातील कोणीही सदस्य किंवा कर्मचारी जखमी झाले नाही. आगीमुळे मालमत्तेचे मोठं नुकसान झालं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla prakash solanke says 8 among those who attacked my house were not maratha asc