भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे या मतदार संघात आता पोटनिवडणूक घेता येणार असून पोटनिवडणूक झाल्यास भाजपा या मतदारसंघात विजय मिळवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एप्रिल २०१४ मध्ये भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघात निवडणूक झाली होती. यात भाजपाचे नाना पटोले हे विजयी झाले होते. मात्र, ८ डिसेंबर २०१७ ला त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे येथे पोटनिवडणूक अपेक्षित आहे. मात्र, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद लक्ष्मण गुडधे यांनी या प्रकरणात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मतदारसंघात २०११च्या जनगणनेनुसार २१ लाख ९० हजार १० मतदार आहेत. २०१४ मध्ये मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सहा कोटी २८ लाख ८६ हजार रुपये खर्च करण्यात आले. आता पुन्हा निवडणूक झाल्यास त्यापेक्षा अधिक खर्च होईल. शिवाय दीड वर्षांने पुन्हा सर्वसाधारण निवडणूक आहे. त्यामुळे दीड वर्षांत दोनदा निवडणुकीचा खर्च करून जनतेच्या पैशाचा अपव्यय होईल. त्यामुळे पोटनिवडणूक घेण्यात येऊ नये, अशी विनंती गुडधे यांनी त्यांच्या याचिकेद्वारे केली होती.

१ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने निवडणूक आयोगाने दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्राचे आदेश दिले होते. यानंतर झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाने आणखी काही दिवसांचा वेळ मागितला होता. बुधवारी या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली. अखेर हायकोर्टाने पोटनिवडणुकीला हिरवा कंदील दाखवला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai high court nagpur bench green signal to bhandara gondia lok sabha by election after nana patole resignation