गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यक्रमांना किंवा बैठकांनाही गैरहजर असल्यामुळे त्यावर वेगळीच चर्चा पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरीच आराम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली. मात्र, त्यांना डेंग्यू असल्याची बाब नंतर स्पष्ट झाली. या पार्श्वभूमीवर अजित पवारांची सार्वजनिक जीवनातील गैरहजेरी चिंतेचा विषय ठरली असताना खुद्द त्यांनीच आपल्या प्रकृतीविषयी अपडेट दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्ण बरं वाटण्यास आणखी काही दिवस जाणार…

अजित पवार यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर यासंदर्भात सविस्तर पोस्ट केली आहे. “गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे”, असं अजित पवारांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बारामतीच्या रंगीत तालमीत अजित पवारांची सरशी

“पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार…”

“डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा, तसेच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर रहावं लागणं हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्तानं भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत”, असंही अजित पवार यांनी नमूद केलं आहे.

“आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना करतो”, अशा शब्दांत अजित पवारांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar health update marathi news dengue treatment x post pmw