भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमात “मला लोक म्हणतात पक्ष माझा, मी भारतीय जनता पार्टीची आहे. मात्र, पक्ष माझा नाहीये,” असं वक्तव्य केलं. यानंतर त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली. इतकंच नाही, तर पंकजा मुंडे नाराज असून पक्षांतर करतील, अशा चर्चांना उधाण आलं. या चर्चांनंतर आता स्वतः पंकजा मुंडेंनीच यावर भाष्य केलं. त्या टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला भाषण करताना नेहमीप्रमाणे जे सुचतं ते मी बोलते. बदल हा अपरिहार्य असतो. निसर्गात आणि जीवनात बदल होत असतात. गोपीनाथ मुंडे असतानाही हे बदल झाले आणि नसतानाही होत आहेत. मी भाषण समोरच्या माणसांना उत्साह, प्रेरणा देण्यासाठी करते. भाषण ऐकण्यासाठी लोक येतात असे खूप कमी वक्ते आहेत.”

“मी थांबत नाही, थकत नाही आणि झुकतही नाही”

“मला अभिमान आहे आणि गोपीनाथ मुंडेंनाही होता की, माझं भाषण ऐकायला लोक येतात. माझ्या भाषणाला नकारात्मक करण्याचे काही लोक प्रयत्न करत असतील. मात्र, त्यामुळे मी थांबत नाही, थकत नाही आणि झुकतही नाही,” असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं.

“आजूबाजूला जे घडतंय त्याप्रमाणे लोक भाषणाचे अर्थ लावतात”

“मी जे बोलते ते समोरच्या व्यक्तींना उद्देशून त्या प्रसंगासाठी बोलते. प्रत्येक ठिकाणी माझं वेगळं भाषण असतं. हे साहजिक आहे की, आजूबाजूला जे घडतंय त्याप्रमाणे लोक भाषणाचे अर्थ लावतात. त्यामुळे मी कुणालाही दोष देऊ इच्छित नाही. मला त्याची दखलही घ्यायची नाही,” असंही पंकजा मुंडेंनी नमूद केलं.

हेही वाचा : पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अनिल देशमुखांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले, “शरद पवार…”

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मध्य प्रदेशच्या प्रभारी पंकजा मुंडे यांनी बुधवारी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, “मला लोक म्हणतात पक्ष माझा, मी भारतीय जनता पार्टीची आहे. मात्र, पक्ष माझा नाहीये. भारतीय जनता पार्टी खूप मोठा आहे. आम्हाला काही नाही मिळालं, तर मी जाईन ऊस तोडायला आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला.”

“रासप माझ्या भावाचा पक्ष आहे. वडिलांशी भांडण झालं, तर मी भावाच्या घरी जाईन”, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde comment on her statement about bjp speculations pbs