शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाचे आता दोन गट झाले आहेत. या फूटीमुळे पक्षाची ताकद कमी झाली असली तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची महाविकास आघाडी कायम ठेवली आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करून पक्षाची ताकद वाढवली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर युती असली तरी त्यांचा पक्ष महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीबरोबर एकत्र आहे. परंतु, प्रकाश आंबेडकर हे मविआ आणि इंडिया आघाडीपासून अलिप्त आहेत. त्यामुळे ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रत्येकी १६ जागांवर निवडणूक लढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला त्यांच्याबरोबर घेण्यास अनुकूल नाही. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला त्यांच्या कोट्यातील १६ जागांपैकी काही जागा वंचित बहुजन आघाडीला द्याव्या लागतील, अशा प्रकारचे तर्क राजकीय विश्लेषक मांडत आहेत.

हे ही वाचा >> “काही अर्बन नक्षलवादी काँग्रेस पक्ष चालवतात, घोषणांपासून धोरणांपर्यंत…”, पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र

दरम्यान, आगामी लोकसभेच्या जागावाटपावर आणि शिवसेनेबरोबरच्या युतीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. आमची निवडणुकीसंदर्भात काय भूमिका आहे त्याचा संदेश आम्ही शिवसेनेपर्यंत पोहोचवला आहे. महाविकास आघाडीतल्या जागावाटपातील जागा निश्चित झाल्या तर मग शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीतल्या जागावाटपाचा भाग सुरू होईल. सगळ्याच शक्यता लक्षात घेत आणि अगदी वाईटात वाईट शक्यताही लक्षात घेत, जर कोणाचीच कोणाशी युती होणार नाही असं गृहित धरून आम्ही राज्यातील ४८ जागांच्या तयारीला लागलो आहोत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar on lok sabha election seat sharing formula and shivsena ubt alliance asc