शिवसेनेतून आमदारांचा एक मोठा गट एकनाथ शिंदेंसोबत असल्यामुळे राज्य सरकार अल्पमतात आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार उरला नसल्याचं बोललं जात आहे. मात्र, दुसरीकडे राज्य सरकार अद्याप अल्पमतात आलेलं नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. या सगळ्या प्रकाराच्या पाठिशी भाजपा असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे नेमकं राज्यात काय घडणार? याची उत्सुकता लागलेली असताना रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही”

राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचं रामदास आठवले यावेळी म्हणाले आहेत. “हे सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. कारण ३७ आमदार शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे मोठा गट शिंदेंसोबत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार, अजित पवार यांनी आमच्याकडे बहुमत आहे अशी भूमिका मांडणं अयोग्य आहे. आपल्याला बहुमत सिद्ध करण्याचा अधिकार आहे. पण इतके आमदार वेगळे झालेले असताना बहुमत असूच शकत नाही. त्यामुळे या सरकारला निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही”, असं ते म्हणाले.

‘आमदारांना निलंबित करू शकत नाही’

दरम्यान, शिंदेंसोबत असणाऱ्या १६ आमदारांना निलंबित करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जात असलं, तरी ते शक्य नसल्याचं आठवले म्हणाले. “१६ आमदारांना निलंबित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण तो अधिकार विधानसभा उपाध्यक्षांना नाही. ३७ आमदारांचा गट दोन तृतियांश बहुमताने एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारकीला अजिबात धक्का लागू शकत नाही. व्हीप सभागृहात असतो, बाहेर नसतो. त्यामुळे एखाद्या बैठकीला हजर राहिले नाही, म्हणून त्यांना पक्षातून काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण त्यांची आमदारकी रद्द करण्याचा अधिकार विधानसभा उपाध्यक्षांना नाही”, असं त्यांनी नमूद केलं.

एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं, नावात बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख!

“फडणवीस म्हणाले, आपला काही संबंध नाही”

“देवेंद्र फडणवीसांसोबत माझी चर्चा झाली आहे. चर्चेत त्यांनी सांगितलंय की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद हा त्यांचा पक्षांतर्गत वाद आहे. त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही. आम्ही सध्या वेट अँड वॉचमध्ये आहोत. आम्हाला कोणतीही घाई नाही. एकनाथ शिंदेंकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही”, अशी माहिती रामदास आठवलेंनी दिली आहे.

“देवेंद्र फडणवीसांनी यात पडू नये, नाहीतर मागे जे सकाळी झालं होतं..”, संजय राउतांचा खोचक टोला!

“…तर आमचे लोक एकनाथ शिंदेंसोबत”

दरम्यान, पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसेना कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याच्या प्रकरणावरून रामदास आठवलेंनी टीका केली आहे. “रिपाइं एकनाथ शिंदेंबाबत सहानुभूती बाळगून आहे. त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. गेलेले आमदार शिवसेनेकडे परत येतील अशी परिस्थिती अजिबात नाही. तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर तुम्ही करू शकता. पण दादागिरी करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. दादागिरीचं उत्तर दादागिरीनं दिलं जाऊ शकतं. एकनाथ शिंदेंवर अन्याय होत असले, तर माझ्या पक्षाचे लोक त्यांच्यासोबत राहतील”, असं आठवले म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athavle on eknath shinde group devendra fadnavis cm uddhav thackeray pmw
First published on: 25-06-2022 at 13:47 IST