Manoj Jarange Patil Meets Maulana Sajjad Nomani Ahead of Maharashtra Assembly Election 2024 : मुस्लीम धर्मोपदेशक, बौद्ध धर्मगुरू व रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष तथा आंबेडकरी समुदायाचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी गुरुवारी (३१ ऑक्टोबर) जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावी जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी सांगितलं की मराठा, दलित व मुस्लिमांना एकत्र करण्याचं काम ते करणार आहेत. गोरगरिबांसाठीचा लढा आता अधिक तीव्र करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील, मुस्लीम धर्मोपदेशक मौलाना सज्जाद नौमानी व आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मौलाना नौमानी यांनी मनोज जरांगे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. तसेच मनोज जरांगे यांनी भारतभर फिरावं असं आवाहनही मौलाना नौमानी यांनी केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मौलाना नौमानी म्हणाले, “मनोज जरांगेंच्या रुपात एक मोठा नेता या महाराष्ट्रात उदयास आला आहे. त्यांनी एक मोठं आदोलन उभं केलं आहे. मी त्यांच्या आंदोलनाची माहिती घेतली. तेव्हा जाणवलं की आपल्या देशाला नवे महात्मा गांधी मिळाले आहेत, नवे आंबेडकर मिळाले आहेत. मनोज जरांगेंच्या रुपात आपल्याला नवे मौलाना अबुल कलाम आझाद मिळाले आहेत. मनोज जरांगे आपल्या देशाला नव्या उंचीवर पोहोचवतील यात मला शंका वाटत नाही”.

हे ही वाचा >> मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर

मौलाना सज्जाद नौमानी काय म्हणाले?

नौमानी म्हणाले, “भारताला पुढे येण्याची क्षमता आपल्या देशातील जनतेत आहे. विविध क्षेत्रांमध्ये जगाचं नेतृत्व करण्याची ताकद आपल्या देशात आहे. मी खूप देश पाहिले आहेत. विविधी ठिकाणी फिरलो आहे. त्यातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, ती म्हणजे आपला देश अध्यात्मिक, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या जगात आघाडीवर आहे. जगातील काही देश असे आहेत जे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात क्षेत्रात प्रगती करत आहेत. परंतु, अध्यात्माच्या बाबतीत ते खूप मागासलेले आहेत. तर, काही देश अध्यात्माच्या बाबतीत खूप पुढे गेलेत. परंतु, त्यांनी विज्ञानाची कास धरलेली नाही. तंत्रज्ञानाला त्यांनी जवळ केलेलं नाही. मात्र, भारत एकाच वेळी अध्यात्मिक जगाचं नेतृत्व करतोय. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देखील प्रगती करतोय. त्यामुळे भारत या तिन्ही क्षेत्रात जगाचं नेतृत्त्व करू शकतो”.

हे ही वाचा >> धनंजय मुंडेंच्या शपथपत्रात पाच अपत्यांचा उल्लेख, २०१९ मध्ये तिघांचीच नोंद; पाच वर्षांत संपत्तीही दुप्पट

मौलाना सज्जाद नौमानी म्हणाले, आपण उदाहरण म्हणून आपले दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडे पाहू शकतो. ते खूप मोठे सन्यांसी होते. तसेच ते अध्यात्माचे मोठे अभ्यासकही होते. आपल्या देशाला त्यांच्यासारख्या नेत्यांची गरज आहे. आज माझ्या शेजारी मनोज जरांगे पाटील बसलेत. मी स्वतः एक फकीर आहे. ते देखील फकीर आहेत. दोन फकीरांचा संगम झाला आहे. ईश्वर करो हा संगम शेवटपर्यंत टिकून राहो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sajjad nomani says manoj jarange patil is modern gandhi ambedkar maulana azad asc