Sanjay Raut on Devendra Fadnavis: महायुतीमधील मंत्र्यांचा शपथविधी होऊन एक महिना लोटल्यानंतर नुकतेच जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर करण्यात आले. मात्र अंतर्गत धुसफूस निर्माण झाल्यानंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्याचा निर्णय रद्द करण्यात आला. यावरून आता महायुतीमधील अंतर्गत कुरघोडी उघड झाली असून विरोधक त्यावर टीका करत आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यात बदल केला. एरवी कडक शिस्त, कठोर निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून प्रतिमा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना स्वतःचाच निर्णय का बदलावा लागला? पालकमंत्रीपदासाठी इतका हौरटपणा का? पालकमंत्रीपदावरून जी दंगल सुरू आहे, ही त्या त्या जिल्ह्यातील आर्थिक उलाढालीवरून सुरू आहे. आर्थिक कारणांवरून ही मारामारी सुरू आहे, त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला निर्णय बदलून ते हतबल, लाचार मुख्यमंत्री असल्याचे दाखवून दिले आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीच्या हातातील बाहुल्या

“दिल्लीने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केला आहे. हे सरकार दिल्लीतून चालेल, असे आम्ही आधीपासून सांगत आलो आहोत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या कळसुत्री बाहुल्या आहेत आणि त्यांच्या हाता-पायांना बांधलेले दोरे दिल्लीतून नाचवले जातात, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. मुख्यमंत्री सरकारचा निर्णय घेऊन राज्यातील गुंडागर्दी, मनमानी मोडण्याचा प्रयत्न करत असताना दिल्ली रस्त्यावर येऊन पालकमंत्रीपदासाठी दंगल करणाऱ्यांच्या बाजूने उभी आहे. पालकमंत्रीपदासाठी दंगल महाराष्ट्राने याआधी पाहिली नव्हती”, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

धनंजय मुंडेंनी आता अजित पवारांना का थांबवलं नाही

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी २०१९ साली पहाटे झालेला शपथविधी हे एक षडयंत्र असल्याचे म्हटले होते. तसेच धनंजय मुंडे यांनीही त्यावेळी अजित पवारांना थांबविण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले. यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, त्यावेळच्या शपथविधीमध्ये जवळपास सर्वच सामील होते. पण तो गुन्हा फसला. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. मुंडे म्हणत आहेत की, त्यावेळी अजित पवारांना थांबिवण्याचा प्रयत्न केला. मग आता का नाही त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करत. काकांच्या पाठीत खंजीर खुपवत असताना तुम्ही त्यांना थांबवायला हवे होते, असे संजय राऊत म्हणाले.

अमित शाह आहेत म्हणून शिंदे सेनेचे अस्तित्व

माजी खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे आमदार शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याचे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, राहुल शेवाळेंचा आम्ही दारूण पराभव केला. आता ते किती फोडाफोडी करणार? अमित शाह आहेत तोपर्यंत शिंदे गटाचे अस्तित्व आहे. त्यानंतर या लोकांना भविष्य नाही. अमित शाह आहेत, म्हणून निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय तुम्हाला हवा तसा निकाल देत आहे. बाकी तुमच्याकडे काय आहे? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticized cm devendra fadnavis over guardian ministership dispute in mahayuti kvg