Satyajeet Tambe : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात पक्षाचा आदेश झुगारून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. याच कारणामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटेले यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा>>> नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा शुभांगी पाटलांना पाठिंबा; नाना पटोलेंची घोषणा

नाना पटोले काय म्हणाले?

सत्यजित तांबे यांच्या निलंबनाबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “तांबे परिवाराचे काय झाले? याबाबतचे प्रश्न आम्हाला विचारू नये. कारण आम्ही त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. राहिल प्रश्न बाळासाहेब थोरात यांचा तर ते आमचे नेते आहेत. सध्या ते रुग्णालयात आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. सत्यजित तांबे यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई आजच करण्यात आली आहे,” असे नाना पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा>>> “भारताला न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसारख्या नेत्याची गरज,” काँग्रेस नेते जयराम रमेश यांचे विधान!

नाशिक पदवीधर मतदारसंघात नेमकं काय घडलं?

सध्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यामुळे हा मतदारसंघ निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे आलेला आहे. या जागेवर विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यासाठी त्यांना पक्षाने एबी फॉर्मही दिला होता. मात्र अर्ज करण्याची मुदत संपेपर्यंत सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाच नाही. त्याऐवजी सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सत्यजित तांबे यांच्या याच निर्णयानंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या.

हेही वाचा>>> सत्यजित तांबे यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश?

सत्यजित तांबे काय भूमिका घेणार

दरम्यान, काँग्रेसने यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर सत्यजित तांबे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. ते येत्या १९ तारखेपर्यंत माझी भूमिका मांडणार, अशी माहिती दिली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satyajeet tambe suspended from congress party for revolt in nashik graduate constituency election said nana patole prd