राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित फूटीवर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर काही वेळापूर्वी सुनावणी झाली. या सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत निवडणूक आयोगासमोर हजर होते. तर अजित पवार गटातील मोठे नेते या सुनावणीला हजर नव्हते. अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी आयोगासमोर अजित पवार गटाची बाजू मांडली. पक्षाच्या महाराष्ट्रातील ५३ पैकी ४२ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. तसेच नागालँडमधील सर्वच्या सर्व सात आमदार आमच्या बाजूने आहेत, असंही मनिंदर सिंह यांनी आयोगासमोर सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पक्षाचे बहुसंख्य आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी अजित पवारांबरोबर असल्याने आम्हीच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत असा दावाही मनिंदर सिंह यांनी निवडणूक आयोगासमोर केला. या सुनावणीनंतर शरद पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. परंतु, शरद पवार यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थोडक्या शब्दांत आजच्या सुनावणीवर भाष्य केलं. जयंत पाटील म्हणाले, ही सगळी माणसं (अजित पवार गट) शरद पवारांच्या कार्यशैलीतून मोठी झाली आहेत. ही माणसं आता शरद पवारांना प्रश्न विचारत आहेत. घरातला लहान मुलगा मोठा होतो. मग त्याला स्वतंत्र व्हायचं असतं म्हणून तो स्वतःचं वेगळं घर बांधतो. परंतु, तो त्याच्या वडिलांना घराबाहेर काढत नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सोमवारी (९ ऑक्टोबर) निवडणूक आयोगासमोर सुनावणी होईल, असं मनिंदर सिंह यांनी सांगितलं आहे.

सुनावणी पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली असून त्यांनी काल्पनिक वाद निर्माण केला असल्याचा दावा सिंघवी यांनी यावेळी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar vs ajit pawar dispute over ncp jayant patil reaction after election commission hearing asc