घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठेही गेले की एकच कॅसेट वाजवतात. कॅसेट ऐकली आहे का कुणी? क्रिकेटची मॅच बघायला गेले की सांगतात की आम्ही सहा महिन्यांपूर्वी आम्ही वर्ल्ड कप जिंकलो. दहीहंडीच्या कार्यक्रमात गेले की सांगतात सहा महिन्यांपूर्वी आम्ही नऊ थर लावले आणि दहीहंडी फोडली. डावोसला गेले तिथेही त्याचंच कौतुक. सरकार कसं पाडलं आणि गद्दारी कशी केली यातच घटनाबाह्य मुख्यमंत्री अडकले आहेत असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. पण महाराष्ट्राला काय दिलं याचा एक शब्दही सांगू शकलेले नाहीत. असं म्हणत आदित्य ठाकरेंनी नाशिकच्या सभेत एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चॅलेंज
मी परवा आदित्य ठाकरे म्हणून परवा त्यांना आव्हान दिलं. तुमच्यासोबत महासत्ता, महाशक्ती आहे ना? चला मी आमदारकीचा राजीनामा देतो तुम्ही राजीनामा द्या. मी काही तुम्हाला तुरुंगात टाकू शकत नाही, धमकीचा फोन करू शकत नाही. माझं फक्त एवढं आव्हान स्वीकाराल. माझ्याविरोधात तुम्ही निवडणूक लढवा आणि जिंकून दाखवा. पण ते काही त्यांनी स्वीकारलं नाही. मग देशभरातल्या सोशल मीडियावरून मला काल परवापासून शिव्या पडत आहेत. पण काही हरकत नाही मला ते शिव्यांच्या रुपाने टॉनिकच मिळतंय जेवढ्या शिव्या पडत आहेत तेवढं मला बरं वाटतं की आपण योग्य दिशेने चाललो आहोत.
मी शिव्या देणार नाही कारण..
मी शिव्या देणार नाही कारण माझ्यात रक्त कुणाचं आहे तर ते इथे ज्यांचं चित्र लागलंय ना त्यांचं रक्त आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं रक्त माझ्यात आहे. शिवसेना हे रक्त माझ्यात आहे. मी नाव जपत पुढे चाललो आहे. मला केंद्रीय नेत्यांपासून गल्लीतल्या लोकांपर्यंतचे लोक शिव्या देऊ लागले. पण मुख्यमंत्री काही बोलले नाहीत. एवढं करण्यापेक्षा मला स्वतः फोन केला असता आणि सांगितलं असतं की मी लढू शकत नाही. तर मी तुम्हाला दुसरं चॅलेंज दिलं असतं. ठाण्यात मी येतो तुमच्या विरोधात लढायला हिंमत असेल तर जिंकून दाखवा. स्वीकारा हे आव्हान. कारण मला माहित आहे की ठाणेही शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
करोना काळात उद्धव ठाकरेंनी पारदर्शी काम केलं
करोना काळात उद्दव ठाकरेंनी जे काम केलं आहे ते लोकांना अजूनही आठवतं आहे आणि लोकं आजही त्यासाठी मला धन्यवाद देत आहेत. आज अनेक लोकं माझ्याकडे स्वतःहून येतात आणि थँक्यू म्हणतात. करोना काळात उद्धव ठाकरेंवर महाराष्ट्राची जबाबदारी होती त्यावेळी अत्यंत पारदर्शी काम त्यांनी केलं. त्याची आठवण आजही लोकांना आहे. जे आपले मतदार नव्हते ते पण आज आपल्याला मत द्यायला तयार आहेत कारण उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम ते विसरलेले नाहीत.
भाजपा आणि मनसेचाही समाचार
नाशिकचा विकास गेल्या दहा बारा वर्षांपासून चांगलाच रखडला आहे. कुणीतरी ब्लू प्रिंट आणली होती ती कुठे विरून गेली काय माहित? असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. तर कुणीतरी नाशिक दत्तक घेणार होतं. पाच हजार कोटी देणार होते काय झालं त्याचं? असं म्हणत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. नाशिकची दहा वर्षे आपण वाया घालवली आहेत. मी आज हे सांगणार नाही की माझ्याकडे अमकी-ढमकी प्रिंट आहे मी हे पण सांगणार नाही की मी नाशिक दत्तक घेईन कारण तेवढा मोठा मी नाही. पण एक सांगेन नाशिकची सेवा करण्याची संधी मला मिळाली तर मी पूर्णपणे ती सेवा करेन असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.