महाराष्ट्रात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील अध्यादेशासाठी आमरण उपोषण चालूच ठेवलं आहे. तर दुसरीकडे पावसानं अनेक भागांत ओढ दिल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या अद्याप सुटण्याची चिन्हं दिसत नसून त्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याचा ठपका ठाकरे गटानं ठेवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. सरकारला एक मुख्यमंत्री व दोन अनुभवी उपमुख्यमंत्री लाभले आहेत. या तिघांना अवतारी पुरुष पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद लाभले आहेत. तरीही महाराष्ट्राचा शेतकरी दुष्काळाने होरपळून गेला आहे. त्याची शेते सुकली व चुली विझल्या आहेत. एका बाजूला एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे आपापल्या गटातील आमदार, खासदारांवर कोट्यवधींच्या निधीची पावसाप्रमाणे बरसात करीत आहेत, पण पाऊसपाण्याअभावी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत या लुटमार निधीतला रुपयाही पोहोचत नाही. राजकारणासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही”, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून राज्य सरकारवर टीकास्र सोडण्यात आलं आहे.

“सरकारमधल्या तिघांना अवतारी पुरुष मोदींचे आशीर्वाद”

“महाराष्ट्राच्या सध्याच्या कृषीमंत्र्यांना याची जाण आहे काय? सध्याचे कृषीमंत्री हे फोडाफोडीत, स्वतःच्या कोर्टकचेऱ्यांत अडकले आहेत. त्यांची शेती, बी-बियाणे वेगळे आहे. अजित पवारांची सभासंमेलने आयोजिण्यात त्यांचा वेळ निघतोय. बीड जिल्हय़ात जेसीबी उभे करून त्यातून ते स्वतःवर फुले उधळून घेताना दिसतात, पण शेतकऱ्यांचे काय? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट म्हणजे ‘डब्बल’ करू ही पंतप्रधान मोदी यांचीही घोषणा होती, पण शेतकऱ्याला अर्धी भाकरही मिळत नाही हे वास्तव आहे”, अशा शब्दांत ठाकरे गटानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही खोचक टीका केली आहे.

अजित पवार सत्तेत येताच राज्य सरकारचे नमते; साखर कारखान्यांना थकहमी न देण्याचा निर्णय

“फडणवीस-अजित पवार पंचतारांकित शेतकरी”

“मुख्यमंत्री शिंदे स्वतःला शेतकरी पुत्र समजतात. ते साताऱ्यातील त्यांच्या शेतावर हेलिकॉप्टर उतरवतात व शेती करतात. फडणवीस-अजित पवारही त्याच पद्धतीचे पंचतारांकित शेतकरी आहेत. पवार-शिंद्यांना रताळे जमिनीत उगवते की झाडावर ते कळते, पण महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणावर त्यांच्याकडे तोड नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ते थांबवू शकत नाहीत”, अशी टीकाही अग्रलेखात करण्यात आली आहे.

“मुंबईतील नगरसेवक फोडण्यासाठी ७०० कोटी”

“मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी आतापर्यंत ७०० कोटी खर्च झाले. त्यात पालिकेचा निधी आहे. नगरविकास खात्याची उधळपट्टी आमदारांवर सुरूच आहे. ती थांबवून सर्व पैसा दुष्काळ निवारणासाठी, शेतकरी बांधवांचे प्राण वाचविण्यासाठी खर्चायला हवा. मराठवाड्यातील बीड जिल्हय़ात एकट्या ऑगस्टमध्ये ३०हून जास्त आत्महत्या झाल्या. आता या मृतांवर कृषीमंत्री ‘जेसीबी’ने फुले उधळणार आहेत काय?” असा परखड सवालही ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray faction slams cm eknath shinde devendra fadnavis ajit pawar farmers issue pmw