मुख्यमंत्री होणार हे कधी समजलं? स्वत: एकनाथ शिंदे यांनीच दिलं उत्तर, म्हणाले…

शपथविधीपूर्वी काही तास आधीपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी येईल, असं सर्वांना वाटत होतं.

Devendra Fadnavis and Eknath Shinde
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे

मागील दहा दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपा त्यांना पडद्याआडून मदत करत असल्याचा दावा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून करण्यात येत होता. मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून भाजपा फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर झाला. पण भाजपानं नेहमीप्रमाणे धक्कातंत्रांचा अवलंब करत एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं दिली.

भारतीय जनता पार्टीचा हा निर्णय अनेकांसाठी खरोखर धक्का देणारा होता. शपथविधीपूर्वी काही तास आधीपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी येईल, असं सर्वांना वाटत होतं. पण भाजपानं सर्वांचेच अंदाज खोटे ठरवले. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदे यांना देखील आपण मुख्यमंत्री होणार याची कल्पना नव्हती. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनीच याबाबत खुलासा केला आहे.

तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात, हे तुम्हाला कधी समजलं? असं विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, “मला हे सर्व अनपेक्षित होतं. पण लोकांमध्ये असा समज होता की, भारतीय जनता पार्टी स्वत:ला मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून फोडाफोडीचं राजकारण करत आहे. पण सगळ्यांचा दावा त्यांनी खोटा ठरवला. त्यांच्याकडे संख्याबळ जास्त असून देखील त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला.”

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, “भारतीय जनता पार्टीमध्ये शिस्तीला फार महत्त्व असतं. मुख्यमंत्रीपदाबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असता ते म्हणाले, ज्या पक्षानं मला सर्वोच्च पद दिलं. आज त्याच पक्षाचा आदेश आहे की मी उपमुख्यमंत्रीपद सांभाळायचं आहे. पक्षाचा आदेश मानून त्यांनी काल उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली,” असंही ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

शिंदे आणि फडणवीस सरकार हे प्रासंगिक सरकार आहे. फार काळ टिकणार नाही, या दाव्यांबाबत विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, “१७० आमदारांचं सरकार टिकणार नाही तर कुणाचं सरकार टिकेल. हे शिंदे सरकार नाही, हे सामान्य जनतेचं सरकार आहे,” असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची घुसमट होत होती का? असं विचारलं असता ते म्हणाले, “मी असं कधीही म्हटलं नाही. आजच मी सगळं बोलणार नाही. वेळ आल्यास नक्की उत्तर देऊ,” असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When eknath shinde know that he will be chief minister answer by himself rmm

Next Story
रायगड जिल्ह्य़ात पावसाची संततधार; शेतकऱ्यांना दिलासा, सखल भाग जलमय
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी