बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान इंडस्ट्रीमध्ये आजवर अनेकांसाठी गॉडफादर ठरला आहे. अनेक अभिनेत्रींना त्याने बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे. त्या यादीत आता आणखी एकाची भर पडली आहे. सलमानच्या आगामी ‘दबंग ३’ या चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मुलगी सई चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सई सोशल मीडियावर हिट ठरतेय.
सई ही अभिनेते महेश मांजरेकर यांची धाकटी मुलगी आहे. ‘दबंग ३’मध्ये ती सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. सोशल मीडियावरील सईचे फोटो पाहून अनेकांना तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. सई इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर बऱ्यापैकी सक्रीय आहे. इन्स्टाग्रामवर ती बरेच फोटो पोस्ट करते. सलमानच्या चित्रपटासाठी सईची घोषणा झाल्यापासून इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
पाहा फोटो : महेश मांजरेकरांची मुलगी आहे सौंदर्यवती; ‘दबंग ३’मधून करणार पदार्पण
सईच्या सुंदरतेवर नेटकरी घायाळ झाले आहेत. सईने ‘दबंग ३’च्या शूटिंगला सुरुवात केली असून सेटवरील तिचा लूक व्हायरल होऊ म्हणून सलमानने विशेष काळजी घेतली आहे. त्याने सेटवर मोबाइल फोनवर बंदी घातली आहे. ‘दबंग ३’ हा चित्रपट २० डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून सलमान व सई अशी नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सौंदर्यासोबतच सईच्या अभिनयाचीही जादू चालेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.