जगभरात प्रसिद्धी पावलेली मालिका म्हणजे ‘फ्रेंड्स’. तब्बल १० वर्षे ही मालिका यशस्वीपणे चालू राहिली. सहा मित्रांच्या आयुष्यातली धम्माल दाखवणारी ही मालिका होती. आता या मालिकेचा विशेष भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबरोबरच अजून एक सरप्राईझ प्रेक्षकांसाठी असणार आहे. काय आहे ते सरप्राईझ…चला पाहूया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘फ्रेंड्स रियुनियन’ या विशेष भागाबद्दल जगभरातल्या ‘फ्रेंड्स’ चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या भागाचं चित्रीकरण पुढच्या आठवड्यात सुरु होणार असल्याची माहिती अभिनेता डेव्हिड श्विमरने दिली आहे. बीबीसीच्या एका टॉक शोमध्ये याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्याने सांगितलं की, तो पुढच्या आठवड्यात ‘फ्रेंड्स रियुनियन’च्या चित्रीकरणाला सुरुवात करेल. अनेक वर्षांनंतर आपण संपूर्ण टीमला भेटणार असल्याचंही त्याने यावेळी सांगितलं.

डेव्हिड श्विमरने या मालिकेत रॉस गेलर ही भूमिका साकारली होती. त्याने या विशेष भागासंदर्भातल्या सरप्राईझबद्दलही यावेळी सांगितलं. तो म्हणाला की, हा भाग स्क्रिप्टेड नाही. त्याचप्रमाणे सर्व कलाकार म्हणजे मॅथ्यू पेरी, जेनिफर ऍनिस्टन, लिसा कुड्रो, कर्टनी कॉक्स, मॅट लीब्लॅंक हे सर्वजण त्यांच्या भूमिका साकारणार नसल्याचंही त्याने सांगितलं. हे सर्वजण स्वतः आपल्या खऱ्या नावांनीच या भागात सहभागी होतील.

“मी खऱ्या आय़ुष्यात जो आहे, तोच या भागातही असेन. काहीही स्क्रिप्टेड नसणार आहे, आम्ही कोणीच आमच्या भूमिकांमध्ये नसणार. आम्ही खऱ्या आयुष्यात जे आहोत, जसे आहोत तसेच या भागातही असू. यात एक विशेष सेक्शन असणार आहे पण मला त्याबद्दल आत्ता काही सांगायचं नाही”, असं श्विमर म्हणाला.

‘द फ्रेंड्स रियुनियन स्पेशल’ हा भाग एचबीओ मॅक्सवर मे २०२०मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे त्याचं चित्रीकरण पूर्ण होऊ शकलं नाही आणि मार्च २०२० मध्येच हॉलीवूडमध्ये होणारी त्याची निर्मिती थांबवावी लागली.

११९४मध्ये ‘फ्रेंड्स’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ती जगभरात एवढी गाजली की, १० वर्षे ही मालिका सुरुच होती. या मालिकेचा शेवटचा भाग २००४ साली प्रसारित झाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friends reunioun special episode shooting will start in next week vsk