एस.एस. राजामौली यांचा ‘RRR’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला. बाहुबलीसारखं यश या चित्रपटाला मिळालं नसलं तरी प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्याचं काम या चित्रपटाने केलं. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट बाहेरील देशातसुद्धा प्रदर्शित करण्यात आला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. खासकरून अमेरिकेतल्या सामान्य जनतेपासून मोठमोठ्या सेलिब्रिटीजनी या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपनेदेखील हा चित्रपट ऑस्करला पाठवायला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. त्यावरून वादही बरेच झाले.
नुकतंच हॉलिवुड अभिनेता आणि दिग्दर्शक डॅनी डेवीतो (Danny DeVito) याने एका मुलाखतीत भारतीय आणि खासकरून बॉलिवूडची प्रशंसा केली आहे. त्याने नुकताच ‘RRR’ हा चित्रपट पाहिला आणि त्यामुळे तो प्रचंड भारावून गेल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. इतकंच नव्हे तर आपल्या मुलीलाही या चित्रपटाने भुरळ घातल्याचं त्याने सांगितलं आहे.
डॅनी म्हणतो “मी बॉलिवूडला खूप आधीपासून फॉलो करतो, नुकतंच मी ‘RRR’ आणि ‘आर..राजकुमार’ हे बॉलिवूड चित्रपट पाहिले जे मला प्रचंड आवडले. मला बॉलिवूडप्रती जास्त आकर्षण आहे ते त्यातल्या अखंड आणि कुठेही विस्कळीत नसलेल्या कथेमुळे. ‘RRR’ मध्ये युद्ध आहे पण त्याचवेळी गाण्याच्या माध्यमातूनही ती कथा पुढे सरकते. मला ही गोष्ट प्रचंड आवडते. आपणही बॉलिवूडसारखंच काहीतरी करायला हवं”
आणखी वाचा : “मी भारतात…” प्रियांका चोप्राने सांगितला हॉलिवूडमध्ये काम करण्याचा अनुभव
एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ या चित्रपटाने सध्या हॉलिवूडवरही चांगलंच गारुड केलं आहे. या चित्रपटात साऊथचे २ सुपरस्टार म्हणजेच ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण झळकले होते. सोबत आलिया भट, अजय देवगण, मकरंद देशपांडे असे काही नावाजलेले चेहेरेसुद्धा महत्वाच्या भूमिके आपल्याला बघायला मिळाले. आता हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता.