साउथ सिनेमाचा सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये खूप व्यस्त आहे. सुपरस्टार प्रभासचा पॅन इंडिया रोमॅण्टिक ड्रामा फिल्म ‘राधे श्याम’ची फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढच्या वर्षी मकर संक्रातीच्या दिवशी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटासाठी फॅन्सची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी मेकर्सनी आजच्या जन्माष्टमीच्या दिवशी एक रोमॅण्टिक पोस्टर रिलीज केलाय. या पोस्टरमध्ये सुपरस्टार प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे सुद्धा रोमॅण्टिक अंदाजात दिसून आलीय. विशेष म्हणजे एकूण सहा भाषांमध्ये या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय.
सुपरस्टार प्रभासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘राधे श्याम’चं पोस्टर रिलीज केलंय. तमिल, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम, हिंदी आणि इंग्रजी या सहा भाषांमध्ये हे पोस्टर रिलीज करण्यात आलंय. या पोस्टरमध्ये प्रभास एका सुंदर टक्सिडोमध्ये दिसतोय, तर पूजा हेगडे सुद्धा अतिशय सुंदर निळ्या रंगाच्या बॉल गाऊनमध्ये गॉर्जिअस दिसून येतेय. हे पोस्टर एखाद्या परीकथेपेक्षा कमी दिसत नाही. या पोस्टरमध्ये पूजा पियानो वाजवताना दिसतेय आणि प्रभास तिला पाहून खूश आहे. चित्रपटाने चाहत्यांसाठी साठवून ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची झलक या पोस्टरमध्ये दाखवण्यात आलीय. “राधे श्यामच्या भव्य पोस्टरसोबत जन्माष्टमी साजरी करा” असं लिहित प्रभासने हे पोस्टर रिलीज केलंय. त्यामूळे हे पोस्टर ‘जन्माष्टमी स्पेशल’ ठरलंय.
राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित, ही एक बहुभाषिक प्रेमकथा 1970 मध्ये युरोपमध्ये घडते आहे. इटली, जॉर्जिया आणि हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रीत झालेला, अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्सने सज्ज राधे श्याम एका मेगा कॅनव्हासवर अवतरत असून, यामध्ये प्रभास आणि पूजा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनोख्या रूपामध्ये दिसणार आहेत.
दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार म्हणाले की, “या चित्रपटावर आम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि आम्ही प्रेक्षकांना एक भव्य नाट्यानुभव देण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. राधे श्याम 14 जानेवारी 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून जन्माष्टमीच्या या विशेष दिवशी चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.”
राधेश्याम हा बहुभाषिक चित्रपट असून टी-सीरिज यांची प्रस्तुती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. यूव्ही क्रिएशन्सने तयार केलेल्या या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे.