बॉलिवूड स्टार प्रियांका चोप्राची चुलत बहीण ही परिणीती चोप्राची ओळख होती. पण, यशराज प्रॉडक्शनच्या मार्केटिंग विभागात काम करणाऱ्या ‘परी’चा चेहरा एकेदिवशी निर्मात्यांना आपल्या चित्रपटासाठी योग्य वाटला आणि मग तिची एंट्री यशराजच्या ‘लेडीज वर्सेस रिकी बेहल’मध्ये झाली, हे सगळ्यांना माहित आहे. मात्र, इन्व्हेस्टमेंट बँकर होण्यासाठी आलेल्या परिणीतीला तिचा मित्र मानव भिंदर याने पहिल्यांदा एका लघुपटात अभिनेत्री होण्याची संधी दिली. मानव आणि परिणीतीच्या या पहिल्याच ‘डोर’ नावाच्या लघुपटाला नुकताच सवरेत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आणि त्यानिमित्याने त्याने ‘परी’शी असलेली मैत्रीची ‘डोर’ उलगडून दाखवली.
‘डोर’ ही मानवची डिप्लोमा फिल्म होती. तरूण मुले करिअरच्या पाठी असतात. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठल्याही शहरात जाऊन शिकण्याची, शिकून परदेशात नोकरीसाठी वास्तव्याला जायचीही त्यांची तयारी असते. पण, ही सगळी धावाधाव करत असताना ज्यांनी आपल्याला मोठं केलं, हे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द दिली त्यांच्या भावभावनांचा क्षणभरही विचार करण्याची उसंत नसते. नात्याची ही ‘डोर’ मानवला आपल्या लघुपटातून उलगडून दाखवायची होती. सैन्यदलात भरती होण्यासाठी निघालेला तरूण आपल्या आजीच्या डोळ्यात त्याच्या ताटातूटीने उठलेला कल्लोळ पाहतो. गाडीत बसून आजीचाच विचार करत असताना त्याची गाठ घरातून पळालेल्या रियाशी (परिणीती)पडते. आणि मग त्याच्याकडून आजीची गोष्ट ऐकता ऐकता रियाला आपल्या नात्यांची डोर सापडते, ही माझी कथा होती असे मानवने ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले.
रियाच्या भूमिकेसाठी मला परीच हवी होती. परी माझी चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे तिचा खटय़ाळ, नटखट स्वभाव मला चांगला माहिती होता. रियाच्या भूमिकेसाठी तिचा तो हसरा, खेळकर पण, प्रसंगी गंभीर होणारा.. स्वत:त हरवणारा चेहरा हवा होता. परी तेव्हा यशराजमध्ये मार्केटिंगचं काम पाहत होती. मी तिला ही भूमिका करण्याविषयी विचारलं. पण, मला अभिनय वगैरे काही येत नाही. त्यामुळे लघुपटात काम करणं मला जमणार नाही, असं तिनं मला बजावलं. तेव्हा तुला मुळीच अभिनय करावा लागणार नाही. तु फक्त मी सांगेन तेवढं कर असं समजावत तिला गळ घातली. कसाबसा तिने होकार दिला पण, तिच्यामुळे आणि अभिनेता नासीर खान यांच्यामुळे ‘डोर’ प्रभावी ठरली, असे मानवने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manav bhinder introduced parineeti chopra to bollywood